वर्धा : वर्धेलगत म्हसाळा या गावी बनावट बियाण्यांची फॅक्टरीच आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रात्री अकरा वाजता पोलिसांनी धाड टाकली तेव्हा नामांकित बियाणे कंपन्यांचे कपाशी वाण म्हणून साधी सरकी पाकिटात भरण्याचे काम काही मजूर करीत असल्याचे दिसून आले. त्यावेळी राहुल जयस्वाल हा मुख्य आरोपी हजर होता. त्याला लगेच ताब्यात घेण्यात आले.
पोलीस अधीक्षक नूरुल हसन हेपण घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आणखी कुमक मागवली. त्यानंतर सातही आरोपींची त्याच ठिकाणी विचारपूस सुरू झाली. बनावट बियाण्यांची मोठ्या प्रमाणात पोती दिसून आली. त्याची मोजदाद सुरू आहे. कृषी अधीक्षक शिवणकर म्हणाले की, हा प्रकार केव्हापासून सुरू आहे, कोणत्या गावात विकल्या गेला, किती शेतकऱ्यांची फसवणूक झाली हे पोलिसांच्या चौकशीतच स्पष्ट होईल.
हेही वाचा – उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरात नळाच्या पाण्यात अळ्या
किमान दोन ते अडीच कोटी रुपये किमतीचे बियाणे घटनास्थळी सापडले. तसेच दहा कोटी रुपयांवर उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शहरालगत बनावट बियाणे तयार करणारा हा कारखाना सुरू करण्याची हिम्मत कशी होते, याची चर्चा सुरू असून आरोपीचे राजकीय वर्तुळात लागेबांधे तपासल्या जाण्याची शक्यता काहींनी व्यक्त केली.