नागपूर : एका वर्षांपासून विविध गुन्ह्यात ‘वॉंटेड’ असलेल्या एका कुख्यात गुन्हेगाराच्या घरावर छापा घातला. छाप्यात गांजासह पाच पिस्तूल, ३६ काडतूस, दोन काडतूसच्या पुंगळ्या आणि अन्य शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वलनी वेकोली वसाहतीत करण्यात आला. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आशिष उर्फ गुल्लू राजबहादूर वर्मा (२५,चनकापूर), अभिषेक उर्फ छोटू अनिल सिंग ( २९ वलनी), गब्बर दत्तूजी जुमळे (३०, वलनी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
सराईत गुन्हेगार आशिष उर्फ गुल्लू याने एका वर्षांपूर्वी सावनेर येथील एका हॉटेल मध्ये हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेपासून आशिष फरार होता. पोलीस त्याच्या मागावर होते. आरोपी आशिष वलनी येथे असल्याची गुप्त माहिती सावनेरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांना मिळाली. कन्हानचे डीवायएसपी संतोष गायकवाड आणि केळवदचे ठाणेदार अनिल राऊत यांना दिली. डीवायएसपी गायकवाड यांनी पोलीस कर्मचाऱ्यासह वलनी वसाहत गाळा क्रमांक ४९ येथे धाड मारली. घटनास्थळावरून फरार आरोपी आशिष राजबहादुर वर्मा यांच्यासह अभिषेक उर्फ छोटू अनिल सिंग, गब्बर दत्तुजी जुमळे यांना अटक केली. यावेळी गाळ्यांची झडती घेतली असता पाच पिस्तूल, ३६ जिवंत काडतूस, दोन रिकामे काडतूस, एक किलो गांजा, नऊ मोबाईल, दोन अतिरिक्त सिमकार्ड असा एकूण २ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी आशिष हा सराईत गुन्हेगार आहे दीड वर्षांपासून त्याच्याकडून पिस्तूल मिळून आल्याने खापरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यानंतर सावनेर येथे एका हॉटेलमध्ये त्याने खुनाचा प्रयत्न केला होता. या घटनेपासून आशिष फरार होता. मागील तीन दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र, सतत हुलकावणी देत होता अखेर डीवायएसपी अनिल मस्केच्या प्रयत्नाला यश आले.
अभिषेक सिंह हा खापरखेडा पोलिसांच्या आशिर्वादाने मागील अनेक महिन्यांपासून वलनी खदान नर्सरी भागात जुगाराचा अड्डा चालवतो. याठिकाणी दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती आहे. शिवाय अवैध दारू, गांजा, चरस, अफिम सारख्या अंमली पदार्थांच्या धंद्यात लिप्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे अवैध धंद्यांना पोलिसच खतपाणी घालत असल्याचे दिसून येत असून सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर आली.