नागपूर : गेल्या काही महिन्यांपासून वाठोडा परिसरातील एका सदनिकेत सुरु असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा घातला. आंबटशौकीन ग्राहकांसोबत दोन तरुणी आढळून आल्या तर त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेणाऱ्या दोन महिला दलालांना अटक केली. प्रिया उर्फ इमली भुसिया , रा. पारडी, ममता बोंद्रे ऊर्फ तिवारी रा. वाठोडा अशी अटकेतील आरोपींची नावे आहे.
वाठोडा परिसरात सदनिकांमध्ये मसाज पार्लर, ब्युटी पार्लर, मेकअप रुम किंवा पंचकर्मच्या नावाखील देहव्यापार सुरु झाला आहे. काही देहव्यापाऱ्याच्या अड्ड्यांना वाठोडा पोलिसांचा आशीर्वाद आहे. काही कर्मचाऱ्यांच्या अशा अड्ड्यावर महिन्याकाठी चकरा असतात, अशी चर्चा आहे.
हेही वाचा…वाशीम : मानोऱ्यात जोरदार पाऊस; नागरिकांची उकाड्यापासून सुटका
ममता आणि प्रियाने अशाच प्रकारे स्वत:च्या घरातच देहव्यापाराचा अड्डा सुरु केला. ममता ही विवाहित असून, भाड्याच्या घरी एकटीच राहते. तिची मैत्रीण प्रिया हीदेखील विवाहित आहे. प्रिया ही वस्तीतील अल्पवयीन मुली, पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिला, ब्युटीपार्लरमध्ये काम करणाऱ्या तरुणी आणि झटपट पैसा कमविण्यासाठी तयार असलेल्या विद्यार्थिनींना हेरून देहव्यापारासाठी तयार करते. त्या मुलींना ममतापर्यंत पोहोचविते. देहविक्रीसाठी ममता स्वत:चे घर उपलब्ध करून देते.
घरात देहव्यवसाय सुरु असल्यामुळे पोलिसांची काही भीतीही नसते. दोघींनीही सुरुवातीला काही तरुणींना ओळखीच्या आंबटशौकीन ग्राहकांपर्यंत पोहचवले. त्यातून त्यांनी चांगला पैसा मिळायला लागला. छाप्यात सापडलेली एक तरुणी(२८) मूळची हैदराबादची असून सध्या नागपुरात राहते. ती विवाहित असून पतीपासून वेगळी राहते. दुसरी तरुणी २० वर्षांची असून ती पदवीची विद्यार्थिनी आहे. या दोघीही प्रियाच्या संपर्कात आल्या. तिने ममतापर्यंत पोहोचविले आणि देहविक्रीचा व्यवसाय सुरू केला. या प्रकरणाची कुणकुण परिसरात होती.
हेही वाचा…मध्य भारतामधील बिबट्या मांजराचे पहिले दर्शन महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी…
पोलिसांनाही गुप्त माहिती मिळाली. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक कविता इसारकर यांच्या नेतृत्वातील पथकाने घटनास्थळ गाठले. तत्पूर्वी एक बनावट ग्राहक पाठविण्यात आला. ग्राहकाने आत जाऊन इशारा करताच दबा धरून बसलेल्या पथकाने छापा घातला. आरोपींच्या ताब्यातून दोन तरुणींची एका खोलीतून सुटका करण्यात आली. तसेच दोन मोबाईल, रोख ५०० रुपये व इतर साहित्य असा एकूण १६ हजार ५४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हेही वाचा…नागपूर : न्यायालयात याचिका दाखल होताच जिल्हाधिकाऱ्यांनी उघडले कस्तुरचंद पार्क…
आरोपींविरुद्ध वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करून दोन्ही आरोपी महिलांना वाठोडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस उपायुक्त निमित गोयल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक कविता इसारकर, पोलीस हवालदार प्रकाश माथनकर, लक्ष्मण चौरे, अश्विन मांगे, कमलेश क्षीरसागर, लता गवई आणि पूनम शेंडे यांनी केली