अकोला: क्रिकेट वर्ल्ड कप सामन्यावर सट्टा लावण्यात येत असल्याचा प्रकार शहरात उघडकीस आला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी छापा टाकून तीन आरोपींना अटक केली. आरोपींकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भारतामध्ये क्रिकेट वर्ल्ड कपचे सामने रंगत आहेत. या सामन्यांवर सट्टा लावण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. जुना भाजी बाजार येथील रहिवासी ललितकुमार सुरेखा हा त्याचे साथीदारांसह क्रिकेट सामन्यावर सामन्यावर सट्टा खेळ चालवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. सपोनि कैलास भगत यांच्यासह पथकाने आरोपीच्या घरी छापा टाकला. त्या ठिकाणी साथीदारांसह क्रिकेट सट्टा चालवत असल्याचे आढळून आले. मुख्य आरोपीसोबत यश संजय सुरेखा व राजकुमार द्वारकादास शर्मा हे सुद्धा क्रिकेट सट्टा चालवतांना आढळून आले.
आरोपींकडून लॅपटॉप, टॅब, मोबाईल, राऊटर व क्रिकेट सट्ट्याचे इतर साहित्य दुचाकी, नगदी १७ हजार असा एकूण दोन लाख नऊ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी शहर कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागिय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.