नागपूर : गेल्या तीन दिवसांत दोन अल्पवयीन मुलांसह चौघे जण नायलॉन मांजामुळे गंभीररित्या जखमी झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा झपाटा सुरू केला. पारडी आणि सदर पोलिसांनी लगेच कारवाई करीत नायलॉन मांजा जप्त केला. विक्रेत्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, पाचपावली परिसरात अजुनही नायलॉन मांजा विक्री होत असून व्यापाऱ्यांना थेट पोलिसांचा आशिर्वाद असल्याची चर्चा आहे.
पारडीतील तेलीपुरा परिसरात नायलॉन मांजी विक्री होत असल्याची माहिती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांना मिळाली. त्यांनी लगेच पथक पाठवून शहानिशा केली. नायलॉन मांजा विकल्या जात असल्याचे स्पष्ट होताच छापा घालण्यात आला. पोलिसांनी जवळपास ९० हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला.दुकानमालक लीलाधर मोतीराम मुळे (५३, महाजनपुरा) याला ताब्यात घेण्यात आले. नायलॉन मांजा कुठून येत असल्याबाबत चौकशी केली असता मोहम्मद इमरान मोहम्मद इक्बाल शेख (रा. भांडेवाडी,पारडी) याचे नाव समोर आले. पोलिसांनी मो. इमरानलाही ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे.
हेही वाचा >>> कारागृहातून बाहेर येताच गुंडाने केला खून, उपराजधानीत दर दुसऱ्या दिवशी हत्याकांड
दुसरा छापा सदर पोलिसांनी घातला. ठाणेदार विनोद चौधरी यांच्या पथकाने खाटीक पुरा, सदर येथील घरावर घातला. आरोपी मो.जूनैद मो.नसीम शेख (२६, बिके हाऊस जवळ खाटीकपुरा) याच्या घरात झडतीदरम्यान ३० नायलॉन मांजाच्या चकऱ्या किंमत अंदाजे २५० ०हजार रुपये किंमतीचा बेकायदेशीर नायलॉन मांजा सापडला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला . सर्वाधिक नायलॉन मांजा पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत विकल्या जातो. अनेक गोदामांमध्ये साठविल्या जातो. अनेक व्यापाऱ्यांचे पाचपावली पोलिसांशी अर्थपूर्ण संबंध असल्याने कोणतीही कारवाई होत नसल्याची चर्चा आहे.