सहभागी होण्याची संधी एकाच जिल्ह्य़ात, अर्ज मात्र अनेक ठिकाणी

राज्यात तरुण बेरोजगारांचे दर्शन घडवणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेत उमेदवाराला एकाच जिल्ह्य़ातील सहभागी होण्याची संधी असली तरी उमेदवारांना अनेक ठिकाणी अर्ज करायला लावून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याची उमेदवारांची भावना आहे.

बेरोजगार तरुणांचे लोंढे त्या त्या जिल्ह्य़ात थोपवून त्यांना तेथील पोलीस भरतीत संधी मिळवून देण्याच्या दृष्टीने २००८पासून राज्यात विविध जिल्ह्य़ांत एकाचवेळी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाते. रेल्वे पोलीस, शहर पोलीस, ग्रामीण पोलिसांची भरती संपूर्ण राज्यात जिल्हानिहाय सुरू झाली आहे. मात्र, एकेका उमेदवाराने एकाचवेळी एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज केले आहेत. अनेक ठिकाणी अर्ज करून त्यांना एकाच ठिकाणच्या भरती प्रक्रियेत भाग घेण्याची संधी मिळणार आहे. असे असतानाही शासनाने मात्र, उमेदवाराचे ऑनलाईन अर्ज वाटेल तेवढय़ा जिल्ह्य़ातून स्वीकारले आहेत. त्या सोबतच त्यांचे शुल्कही स्वीकारले आहे. एकटय़ा मुंबईत या पोलीस भरतीसाठी सर्वात जास्त १ लक्ष ८० हजाराच्यावर उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्य़ावार हजारो उमेदवार पोलीस होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. नागपूर लोहमार्ग पोलीस शिपाईपदाच्या २५ जागा आहेत. त्यातही ३३ टक्के आरक्षणाप्रमाणे सात जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यासाठी तब्बल २ हजार ९३६ अर्ज आले आहेत. यावरून बेरोजगारांचे प्रमाण एकीकडे अधोरेखित होते. यातील अनेकांनी एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज केले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करणारे, शेवटची संधी असलेले हौशी उमेदवार येथे नाहीतर आणखी कोठेतरी पोलीस होण्याची संधी मिळेल म्हणून आस लावून बसले आहेत. त्याचा पुरेपूर फायदा उचलत शासनाने त्यांचे अर्ज अनेक ठिकाणांहून ऑनलाईन स्वीकारले. पोलीस शिपाई खुला प्रवर्ग गटासाठी ३२० रुपये तर मागासवर्गीयांसाठी १७० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. एका उमेदवाराला एकाच जिल्ह्य़ाच्या भरती प्रक्रियेत सामील होण्याची संधी उमेदवाराला देऊ केली असताना त्यांच्याकडून अनेक ठिकाणी शुल्क वसूल करण्यात आले. नागपुरात लोहमार्ग पोलीस भरतीसाठी उमेदवारांनी एकाचवेळी मुंबई, ठाणे, नागपूर ग्रामीण, गडचिरोली, चंद्रपूर अशा पाच ठिकाणी ऑनलाईन अर्ज केले आहेत. नागपुरात निवड नाही झाली तर मुंबई किंवा ठाण्यात होईल, या आशेवर त्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. जवळ पैसे नसल्याने उसनवारी करून या पाचही ठिकाणच्या भरती प्रक्रियेत सामील होण्याचा त्यांचा मानस आहे. पण एकाच ठिकाणची भरती प्रक्रिया आटोपण्यासाठी सहा ते आठ दिवस लागणार असल्याने मुंबई किंवा ठाण्याला जाऊ शकत नसल्याची खंत उमेदवारांनी व्यक्त केली आहे.

उमेदवारांनी चार-पाच ठिकाणी अर्ज केले असल्यास त्यास आम्ही जबाबदार नसून ती त्याची एकटय़ाची जबाबदारी आहे. उमेदवारांना एकाच ठिकाणच्या भरती प्रक्रियेत सहभागी होता येईल, असे जाहिरातीत स्पष्टपणे नमूद केले असताना त्यांनी जर अनेक ठिकाणी अर्ज केले असतील तर ती त्यांची चूक आहे.

– उत्तमराव खैरमोडे,  अपर पोलीस अधीक्षक, लोहमार्ग