नागरिकांच्या सोयीसाठी पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आले खरे मात्र जिल्ह्यात असे एक पोलीस मदत केंद्र आहे जिथे नागरिकांऐवजी जनावरांचीच उत्तम सोय होत आहे. पोलीस मदत केंद्रासाठी इमारत वापरली, मात्र त्याचे भाडे देण्यास गृह विभागाला विसर पडला आहे. आता भाडे थकवले म्हणून संतप्त घरमालकाने पोलीस मदत केंद्रालाच जनावरांचा गोठा बनवल्याचा प्रकार नक्षल प्रभावित लाखनी तालुक्यातील केसलवाडा (पवार) येथे घडला आहे.
नक्षल प्रभावित क्षेत्रातील नागरिकांना तात्काळ संरक्षण आणि मदत मिळावी, या हेतूने अशा नक्षल प्रभावित गावांमध्ये पोलीस मदत केंद्र सुरु करण्यात आले. मात्र, लाखनी तालुक्यातील केसलवाडा गावातील हे पोलीस मदत केंद्र काही दिवसातच बंद पडले. ज्या इमारतीत हे पोलीसांचे दूरक्षेत्र केंद्र सुरु केले त्या घर मालकाला पोलीस विभागाने भाडेच दिले नाही. त्यामुळे भाड्यापासून वंचित असलेल्या घरमालकाने पोलीस मदत केंद्राची मालमत्ता स्वतःच्या ताब्यात घेऊन तिथे पाळीव जनावरे बांधायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता गृह विभागाची पोलीस मदत केंद्राची ही इमारत गुरांचा गोठा बनला आहे.
हेही वाचा >>> अमरावती : वीज चोरांचा धुमाकूळ; अडीच कोटी रुपयांची वसुली
भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा प्रकार असून केसलवाडा (पवार) या गावातील पोलीस दूरक्षेत्र केंद्रातील ही घटना घडली आहे. ३ नोव्हेंबर २०१८ रोजी या पोलीस चौकीचे उद्घाटन भाजपचे तत्कालीन ऊर्जामंत्री तथा आताचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले होते. केसलवाडा (पवार) हे गाव लाखनी पोलीस स्टेशन हद्दीत असून ते नक्षल प्रभावित क्षेत्रात येत असल्याने या परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी या पोलीस मदत केंद्राची सुरुवात करण्यात आली होती. काही दिवस या केंद्रातून नियमित कामकाज पार पडले, मात्र, कालांतराने हे मदत केंद्र बंद पडले. त्यामुळे पोलीस विभागाचे महत्त्वाचे दस्तावेज आणि साहित्य आजही त्याच ठिकाणी धूळखात पडलेले आहेत.
पोलीस मदत केंद्राला गोठ्याचं स्वरुप
दरम्यान, या इमारतीचं भाडे मिळावे, यासाठी घर मालकाने वारंवार पोलीसांच्या वरिष्ठांकडे मागणी केली. त्यानंतरही त्यांना भाडे मिळाले नाही आणि मदत केंद्रही सुरु झालेले नाही. त्यामुळे संतप्त घर मालकाने या पोलीस चौकीत स्वतःची जनावरे बांधायला सुरुवात केली असून आता या पोलीस मदत केंद्राला जनावरांच्या गोठ्याचं स्वरुप आलं आहे.
ग्रामस्थांचा गृहमंत्री फडणवीसांना सवाल
या परिसरातील नागरिकांना पोलीस ठाण्याच्या संदर्भातील कुठलीही समस्या असल्यास १२ किलोमीटरचे अंतर कापून लाखनी पोलीस ठाण्यात पोहोचावं लागते. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असून तेच भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने हे पोलीस मदत केंद्र सुरु होणार का? असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.