नागपूर : तीन महिन्यांची गर्भवती असतानाच माहेरी आलेल्या महिलेला तिच्या प्रियकराने सांभाळले. तिच्या बाळालाही स्वतःचे नाव दिले. मात्र, मुलगी मोठी झाल्यानंतर तिने आईच्या प्रियकराविरुद्ध बंड पुकारले. तिने घरात न राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आईवर प्रियकर आणि स्वतःच्या मुलीला निवडण्याची वेळ आली. मात्र, तिच्या मदतीला पोलीस धावून आले. समुपदेशन करीत आई आणि मुलीचे पुनर्मिलन करीत शेवट गोड केला.
सक्करदऱ्यात राहणाऱ्या तरुणीचे लग्न झाले आणि सुखाने संसार सुरु झाला. मात्र, हुंड्यावरुन मानसिक व शारीरिक त्रास देणे सुरु केले. त्यामुळे नवविवाहित महिला माहेरी आली. त्यावेळी महिला तीन महिन्यांची गर्भवती होती. कुटुंबियांनी तिला गर्भपात करण्याचा सल्ला दिला. मात्र, महिलेने बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. तिला गोंडस मुलगी झाली. मुलीची जबाबदारी वाढल्यामुळे महिलेने नोकरी करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान महिलेची एका युवकाशी ओळख झाली. दोघांचे सूत जुळले. दोघांनी लग्नाचा विचार केला. मात्र, युवकाच्या कुटुंबियांनी लग्नास विरोध दर्शविला. त्या युवकाने लग्न न करता प्रेयसीसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. तिच्या मुलीलाही प्रियकराने स्विकारले. शिक्षणाचाही खर्च त्यानेच उचलला. मुलीने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. मात्र, आता तिला आईचा प्रियकर घरात नकोसा वाटायला लागला. आई तिच्यापेक्षा प्रियकराला जास्त वेळ देते, अशी ती तक्रार करीत होती. तिने आईपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ‘मुलगी किंवा प्रियकर’ अशा पेचात आई अडकली.
मुलीच्या प्रेमाला आईचा विरोध
वैद्यकीय शिक्षण घेऊन नोकरी करीत असलेली मुलगी एका युवकाच्या प्रेमात पडली. तिने आईला प्रेमसंबंधाबाबत सांगितले. युवकाने लग्नाची मागणी घातली. मात्र, आई आणि तिच्या प्रियकराने तिच्या प्रेमाला विरोध केला. तिने प्रियकराला नकार दिला आणि घरात असलेल्या आईच्या प्रियकराबाबत प्रश्न विचारत वाद घातला. तसेच घर सोडण्याचा निर्णय घेतला.
भरोसा सेलने घेतला पुढाकार
आई-वडील मानसिक छळ करतात आणि आई वेळ देत नाही तसेच तिच्या प्रियकरामुळे घरात वाद होत आहेत, अशी लेखी तक्रार तरुणीने केली. आई आणि तिच्या प्रियकरासोबत घरी न राहण्याची इच्छा बोलून दाखवली. पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांनी नाजूक नात्याचा गुंता सोडवला. तरुणीचे समूपदेश केले. तसेच आईचे आणि तिच्या प्रियकराशी संवाद साधला. तिला आईच्या प्रियकराने केलेला संघर्ष आणि पित्यासारखी घेतलेली भूमिका याबाबत समूपदेशन केले. मुलीने घर सोडण्याचा निर्णय रद्द केला. तिघेही जणांनी पुन्हा एकत्र राहण्यास पसंती देत एकाच वाहनाने घर गाठले.