लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गडचिरोली : मोठा घातपात घडविण्याच्या उद्देशाने पुरून ठेवलेली स्फोटके नष्ट करून गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचा डाव उधळून लावला. कुरखेडा तालुक्यातील कोटगुल पहाडीजवळ ‘कुकर’मध्ये स्फोटके पेरून ठेवण्यात आली होती.

मार्च ते मे महिन्यादरम्यान तीन महिने नक्षलवाद्यांकडून पोलिसांना नुकसान पोहोचविण्यासाठी ‘टॅक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन’ (टीसीओसी) अभियान राबविले जाते. या पार्श्वभूमीवर ही स्फोटके घातपात करण्यासाठी जमिनीत दडवून ठेवल्याचा अंदाज आहे.

आणखी वाचा-सरपण आणण्यासाठी जंगलात गेला अन् वाघाचा भक्ष्य ठरला, चंद्रपूरच्या कच्चेपार जंगलातील घटना

सोमवारी कुरखेडा तालुक्यातील कोटगुलपासून ५०० मीटर अंतरावरील पहाडीच्या पायथ्याजवळ गोंडरी जंगल परिसराकडे जाणा­ऱ्या पायवाटेवर नक्षलवाद्यांनी पोलीस पथकांना नुकसान पोहोचविण्यासाठी स्फोटके व इतर साहित्य पेरून ठेवल्याची गुप्त माहिती कोटगुलचे प्रभारी अधिकारी धनंजय कुलकर्णी यांना मिळाली होती. त्यांनी बॉम्ब शोधक व नाशक पथकाला (बीडीडीएस) पाचारण करुन जंगल परिसरात शोधमोहीम राबविली. यावेळी अत्याधुनिक उपकरणाद्वारे तपासणी केली असता जमिनीत दीड ते दोन फूट प्रेशर कुकरमध्ये दोन किलो घातक स्फोटके पेरुन ठेवली असल्याचे समोर आले. ही स्फोटके सुरक्षितरीत्या जागीच नष्ट करण्यात आली.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक यतीश देशमुख, एम. रमेश, उपअधीक्षक रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी, बीडीडीएस पथक प्रभारी अधिकारी मयूर पवार, हवालदार पंकज हुलके, अनंत सोयाम, अंमलदार सचिन लांजेवार, तिम्मा गुरनुले यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police spoiled naxalites big assassination plan by destroy the explosives ssp 89 mrj