नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास (एनआयटी)मध्ये तक्रार केल्याच्या रागातून निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाने सुपारी देऊन एका वृद्धाच्या हल्ल्याचा कट रचला. पोलिसांनी पकडताच त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला मेयो रूग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णालयातून सुटी मिळताच त्याला पोलिसांनी अटक केली. राजाराम ढोरे (६२) रा. नागसेन सोसायटी, मानकापूर असे अटकेतील मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्यासोबत या कटात सामील अब्दुल वसीम अब्दुल सलीम (४१) रा. छावनी, अनिल जेम्स चोरे (३२), अनिकेत उर्फ निक्की बहादुरे (२७) दोन्ही रा. मेकोसाबाग आणि अभय (२०) यांनाही अटक केली आहे. सुरेश प्रल्हाद सोनटक्के (६५) रा. नवीन मानकापूर असे जखमीचे नाव आहे.

मुख्य आरोपी राजाराम ढोरे हा शहर पोलीस खात्यातून पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाला आहे. फिर्यादी सोनटक्के हे महावितरणमधून निवृत्त आहेत. नागसेन सोसायटीत सोनटक्के, ढोरे आणि ढोरेचा जावई हे शेजारी-शेजारी राहतात. ढोरेच्या घराजवळ काही जागा रिकामी होती. जावयाने त्या जागेवर अतिक्रमण करून झुंबा क्लास सुरू केले होते. ढोरेची मुलगी झुंबा वर्ग चालवायची. संगीताच्या आवाजामुळे सोनटक्के यांना त्रास होत होता. त्यांनी अनेकदा ढोरेला याबाबत सांगितले होते, मात्र तो दुर्लक्ष करीत होता. त्यामुळे कंटाळून सोनटक्के यांनी नासुप्रकडे तक्रार केली. या प्रकारामुळे ढोरे नाराज होता. त्याने सोनटक्के यांना धडा शिकवण्यासाठी कट रचला. अब्दुल वसीमला २० हजार रुपयांत सोनटक्केची सुपारी दिली. अब्दुल वसीमने अनिल, अनिकेत आणि अभयला योजना सांगितली. गत १७ फेब्रुवारीला सोनटक्के पालकमंत्री बावणकुळे यांच्याकडे तक्रार करण्यासाठी दुचाकी वाहनाने रवीभवन येथे जात होते. वसीम व त्याच्या साथीदारांनी सोनटक्केचा पाठलाग सुरू केला. अनिकेत आणि अभय एका दुचाकीवर तर अब्दुल आणि अनिल दुसऱ्या वाहनावर होते. सोनटक्के हे प्रोव्हिडन्स स्कूल मार्गाने जात असताना अनिकेतने त्यांच्या डोक्यावर लाकडी दंड्याने हल्ला चढविला. मात्र, त्यांनी वार हुकविल्याने हातावर लागला. आरडा ओरड होताच आरोपी पळून गेले. रस्त्याने जाणारे लोक गोळा झाले. त्यांनी जखमीला सदर पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी वृद्धावर हल्लाची घटना गंभीरतेने घेतली. फुटेजच्या आधारावर पोलिसांनी वसीम आणि त्याच्या साथीदारांचा शोध लावला.

ताब्यात घेताच बिघडली प्रकृती

पोलिसांनी अब्दुल, अनिल आणि अनिकेत या तिघांना अटक केली. परंतु, आरोपी आणि जखमीचा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता यातील मुख्य सूत्रधार पोलीस उपनिरीक्षक राजाराम ढोरे असल्याचे समोर आले. पोलिसांनी ढोरेला ताब्यात घेताच त्याची तब्येत बिघडली. त्याला मेयो रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान तिन्ही आरोपींची न्यायालयाच्या आदेशाने कारागृहात रवानगी करण्यात आली. रूग्णालयातून सुटी होताच ढोरेला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. यातील आरोपी अभयचा पोलीस शोध घेत आहेत. ही कारवाई मिलिंद भगत, सतीश गोहत्रे, आशिष बहाळ, सचिन कावळे, पंकज तिवारी, बालाजी गुट्टे यांनी केली.

Story img Loader