मंगेश राऊत
गंभीर गुन्ह्य़ांमध्ये घट, प्रतिबंधात्मक कारवाईत वाढ
उपराजधानीच्या पोलिसांना गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात यश आले असून त्याचे परिणाम गुन्हेगारी कमी होण्यामध्ये झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्य़ांमध्ये घट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे नागपूर हे महाराष्ट्राचे सत्ताकेंद्र झाले आहे. तेव्हापासून शहरातील प्रत्येक छोटय़ा-मोठय़ा गुन्ह्य़ाची बातमी होते. त्यामुळे विरोधी पक्षातील नेतेही आता नागपूरला गुन्हेगारांची राजधानी संबोधायला लागले आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात कार्य करणाऱ्या नागपूर पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवल्याचे आकडेवारी दर्शवते.
सप्टेंबर २०१७ पर्यंत शहरात एकूण ६४ खुनाच्या घटना घडल्या होत्या. २०१८ सप्टेंबपर्यंत ५८ खुनाच्या घटना घडल्या असून ६ ने घट झाली आहे. खुनाच्या प्रयत्नाच्या घटना गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ ने कमी आहेत. २०१७ मध्ये खुनाच्या प्रयत्नाच्या घटना ६३ घडल्या होत्या. यंदा त्या ४७ घडल्या.
रस्त्याने फिरणाऱ्या महिलांची सोनसाखळी पळवण्याच्या वाढत्या घटनांनी महिला चिंतित होत्या. या घटनांमध्येही ३४ ने घट झाली आहे. गेल्या वर्षी सोनसाखळी पळवण्याच्या घटना ७२ घडल्या होत्या. यंदा त्या ३८ आहेत. पोलिसांचा नियमित बंदोबस्त व नाकाबंदीने हे शक्य झाले आहे. जबरी चोरीच्या एकूण घटनांचा विचार करता २०१७ मध्ये सप्टेंबपर्यंत २६३ गुन्ह्य़ांची नोंद झाली होती. यंदा ही संख्या १७७वर आली आहे.
महिलाविषयक अत्याचारांच्या घटनांमुळे अनेकदा स्थानिक पोलिसांवर टीकेची झोड उठते. मात्र, यातही घट झाली आहे. बलात्काराचे गुन्हे गेल्या वर्षीच्या तुलनेत ४ ने कमी आहेत. गेल्या वर्षी १२२ घटनांची नोंद करण्यात आली होती. यंदा या घटना ११८ आहेत. विनयभंगाच्या घटना २०१७ मध्ये २९७ घडल्या होत्या. यंदा त्या घटना १७ ने कमी असून २८० इतक्या घडल्या.
सहा टोळ्यांविरुद्ध मोक्का
शहरात गुन्हेगारांच्या टोळ्या कार्यरत असून त्यांना वेसण घालण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत पोलिसांनी सहा टोळ्यांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे, तर १० कुख्यात गुंडांविरुद्ध एमपीडीएची कारवाई करून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे.
गुन्हेगारांवर पाळत ठेवण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले. त्यानंतर वस्त्यांमध्ये खाकी वर्दी दिसायला हवी म्हणून कर्मचाऱ्यांची ‘फूट पेट्रोलिंग’ सुरू केली. मटका, जुगार आणि अवैध दारू विक्री अशा व्यवसायात गुंतलेल्यांवर अधिकाधिक प्रतिबंधात्मक कारवाई केली. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात आली. समुपदेशनामुळे अनेक जण गुन्हेगारीपासून परावृत्त झाले. शहराला गुन्हेगारांची राजधानी संबोधणे चुकीचे आहे.
– डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस आयुक्त, नागपूर.