लोकसत्ता टीम
अमरावती : एकाच दुचाकीवरून पाच शाळकरी मुले सुसाट जात असल्याची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारीत झाल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी वाहतूक शाखेच्या साहाय्यक आयुक्तांना कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार, दुचाकी आणि त्यावरील पाचही मुलांची अवघ्या पाच ते सहा तासांत ओळख पटविण्यात आली. त्यांच्या पालकांना बोलावून समज देत दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शहरात वाहतूक शाखेकडून दंड होत असला, तरी ट्रिपलसिट वाहने चालविणे अगदी सामान्य बाब आहे. त्यात कळस म्हणजे एका दुचाकीवर चक्क पाच जण सुसाट जात असल्याची चित्रफित प्रसारीत झाली. त्यातही दुचाकीवरील सर्व अल्पवयीन. त्यामुळे वाहतूक शाखेचे साहाय्यक आयुक्त मनीष ठाकरे यांनी त्या चित्रफितीमधील दुचाकीचा क्रमांक एमएच २७ एवाय ५१४० हा असल्याबाबतची खात्री करून घेतली. क्रमांकाच्या आधारे दुचाकीचा मालक मोहम्मद अन्सार रा. अचलपूर यांच्यासोबत संपर्क साधण्यात आला. त्यावर आपण ते वाहन चार वर्षांपूर्वी अमरावतीमधील शेख सादीक शेख रजा यांना विक्री केल्याचे मोहम्मद अन्सार यांनी सांगितले. त्याआधारे शेख सादीक यांचा शोध घेऊन दुचाकीबाबत विचारणा करण्यात आली. त्यांनी ती दुचाकी जेल क्वॉर्टर परिसरातील एका व्यक्तीला विक्री केल्याचे सांगितले. पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नसतानाही मनीष ठाकरे व वाहतूक शाखेतील अंमलदारांनी तत्काळ त्या व्यक्तीचा शोध घेतला. त्याला त्या पाच शाळकरी विद्यार्थ्यांची दुचाकी चालवितानाची चित्रफित दाखविण्यात आली. त्यावेळी त्याने ती दुचाकी आपलीच असल्याचे सांगितले. त्यावरील पाचपैकी दोन मुले आपली असल्याचे मान्य करून ते शिवाजीनगर परिसरातील एका शाळेत शिक्षण घेत असल्याचे त्याने सांगितले.
साहायक पोलीस आयुक्त मनीष ठाकरे व पोलीस निरीक्षक संजय आढाव, अंमलदारांनी अवघ्या पाच ते सहा तासांत या घटनेचा छडा लावत दुचाकीवरील पाचही मुलांच्या पालकांना वाहतूक शाखेच्या कार्यालयात बोलावून समज दिली. या प्रकरणी दुचाकी जप्त करून मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करून सात हजार रुपये दंड आकारण्यात आला. हे प्रकरण लवकरच न्यायालयात सादर करण्यात येणार आहे