एका गुंडाचे लग्न अगदी काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. लग्नानिमित्त दोन्ही परिवारांमध्ये आनंदाचे वातावरण असताना नागपूर पोलिसांनी एका प्रकरणात सदर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात घडलेल्या मारहाण करून खंडणी मागण्याच्या प्रकरणात मोक्कांतर्गत कारवाई केली. या प्रकरणात नवरदेव गुंडही अडकला. मोक्कामध्ये अटक झाल्यापासून किमान सहा महिने जामीन नाही. त्यामुळे नवरदेव गुंड फरार असून त्याच्या लग्नावर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. सय्यद शब्दर सय्यद शब्बीर रा. गोवा कॉलनी असे गुंड नवरदेवाचे नाव आहे. गड्डीगोदाम भागातील रहिवासी असलेल्या त्याच्याच नात्यातील मुलीशी शब्दरचे लग्न जुळले. येत्या २३ एप्रिलला त्यांचे लग्न आहे. सैय्यद शब्दर याच्याविरुद्ध मारहाण करणे आणि खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देणे, असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

या प्रकरणाची हकीकत अशी, गेल्या ८ मार्च २०१६ रोजी बॉबी अनिल भनवार (२०, रा. मंगळवारी, सदर) हा आणि त्याचा मित्र छोटू तागडे हे एका कार्यक्रमातून घरी परत येत असताना आरोपी सैय्यद फिरोज सैय्यद नूर (३३, रा. गोवा कॉलनी), सैय्यद नौशाद सैय्यद कलीम (२१, रा. गोवा कॉलनी), राजू बिलमोहन चौरसिया (४६, रा. मंगळवारी, बाजार), राकेश उर्फ निक्की अशोक गेडाम (३४, रा. पाटणकर चौक) आणि राजा खान उर्फ राजा अब्दुल गफार (२४, रा. गोवा कॉलनी) यांनी आपल्या साथीदारांसह त्यांना रस्त्यात अडवून खंडणीसाठी मारहाण केली. त्या ठिकाणाहून कसेबसे जीव वाचवून बॉबी आणि छोटू घरी निघून गेले आणि सदर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार प्राप्त होताच आरोपींना अटक केली. त्यांचा गुन्हेगारीविषयक इतिहास गोळा केला असता त्यांच्याविरुद्ध मारहाण करणे, खंडणी मागणे, अपहरण करणे, अवैध शस्त्र बाळगणे आदी स्वरूपाचे गुन्हे यापूर्वीच दाखल होते. पोलिसांनी १२ मार्चला त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक (मोक्का) कायद्यान्वये कारवाई केली. त्या दिवसापासून सैय्यद शब्दर फरार होता. मोक्का प्रकरणात अटक झाल्यापासून आरोपपत्र दाखल होईपर्यंत किंवा सहा महिन्यांपर्यंत जामीन मिळण्यासाठी अर्ज करता येत नाही. येत्या २३ एप्रिलला शब्दरचा विवाह ठरला आहे. त्याला अटक झाली तर, लग्न समारंभ पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच तो फरारी असून आता काय करावे? असा सवाल त्याला आणि त्याच्या कुटुंबाला भेडसावत आहे. या संपूर्ण पाश्र्वभूमीवर सैय्यद शब्दरच्या लग्नावर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे.

लग्नमंडपातून अटक करणार?

सैय्यद शब्दर हा लग्नापर्यंत फरारी राहिल्यास त्याला लग्न मंडपातून अटक करण्याची तयारी पोलीस करीत आहेत. त्यामुळे सदर पोलीस ठाण्याचे एक पथक दररोज गोवा कॉलनीतील त्याच्या घरी भेट देत आहे. शिवाय त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही पोलीस धमकावत असल्याची माहिती आहे.

Story img Loader