नागपूर : निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला होणे, ही घटना आमच्यासाठी आव्हानात्मकच आहे. या घटनेला आम्ही गांभीर्याने घेतले असून खून करण्याच्या उद्देशाने हल्ला करणे, असे गंभीर कलम लावण्यात आले आहे.

या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा दावा नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते अनिल देशमुख नरखेड येथील प्रचारभा आटोपून परत येत होते. जलालखेडा-काटोल मार्गावरील बेलफाट्याजवळून त्यांची कार जात असताना दोन दुचाकींनी आलेल्या अज्ञात चार युवकांनी कारवर दगडाने हल्ला केला. त्यामुळे कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार थांबताच हल्लेखोरांनी अनिल देशमुख यांच्यावर दगडाने हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी ‘भाजप जिंदाबाद, अनिल देखमुख मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या.

हेही वाचा >>> खाजगी प्रवासी वाहनाची दुचाकीस धडक; पिता-पुत्र जागीच ठार; कोलवड गावावर शोक कळा

अचानक हल्ला झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या डोक्याला जबर मार लागला. चारही हल्लेखोर भारसिंगी गावाच्या दिशेने दुचाकीने पळून गेले. थेट माजी गृहमंत्र्यावर हल्ला झाल्याने हा गुन्हा आमच्यासाठी आव्हानात्मक आहे. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून या गुन्ह्याच्या तपासासाठी एआयचा वापर करण्यात येणार आहे.

 ‘डम्पडाटा’ आणि सीसीटीव्ही फुटेज घेणार ताब्यात

हल्ला झालेल्या मार्गावर असलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात येणार आहे. तसेच घटनास्थळाजवळील मोबाईल टॉवर लोकेशनसाठी ‘डम्पडाटा’ काढण्यात येणार आहे. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळावरून काही वस्तू जप्त केल्या आहेत. त्याचाही तपासात उपयोग होईल. एआयचा वापर करून घटनेची ‘रि-क्रिएशन’ करून गुन्ह्याचा तपास करणार येईल, अशी माहिती अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.

…तर पोलिसांवर कारवाई करू

नियमांनुसार अनिल देशमुख यांना ग्रामीण आणि शहर पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. मात्र, घटनेच्या दिवशी सुरक्षारक्षकांचे वाहन जवळपास एक किमी मागे होते, ही बाब तांत्रिक जरी असली तरी पोलीस कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात येईल. चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे विशेष पोलीस महानिरीक्षक भूजबळ म्हणाले.

अद्याप जबाब नोंदवला नाही अनिल देशमुख यांनी जबाब देण्यासाठी मानसिक तयारी नसल्याचे सांगितले असून त्यांचे कारचालक धीरज चंडालिया, अन्य कारचे चालक मयूर कोळसे, प्रमोद सलामे व अविनाश ठाकूर यांचेही जबाब नोंदवण्यात येणार आहे. त्यांना नोटीस देण्यात आली असून ते शहरात उपलब्ध नसल्यामुळे जबाब नोंदवण्यासाठी आले नाही. आतापर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत आम्ही पोहचलो नाहीत. गाडीवर हल्ला नेमका कसा झाला, आरोपींचा काही राजकीय पक्षाशी संबंध आहे का, याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही, सखोल तपासानंतर सत्य समोर येईल, असेही भुजबळ म्हणाले.