नागपूर: मध्यरात्री सक्करदरा आणि नंदनवन पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करीत दरोड्याच्या तयारीत असणार्या दोन टोळ्यांना गजाआड केले. दोन्ही कारवायांमध्ये दोन्ही टोळ्यांतील ८ आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. सणासुदीत अप्रिय घटना टाळण्याच्या दृष्टीने पोलिसांनी कंबर कसली असून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले.
सक्करदाऱ्याच्या बिंझाणी कॉलेजच्या आवारात झुडुपांमध्ये गोपाल ऊर्फ बाला पिंपळकर, सैय्यद बिलाल , गौरव ऊर्फ टकल्या बोरकर आणि शैलेश ऊर्फ बाजा बोरकर सर्व रा. जुने बिडीपेठ हे दडी मारून बसले होते. गस्तीवर असलेल्या सक्करदरा पोलिसांचे त्यांच्यावर लक्ष पडले. घेराव घालून त्यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ३ हत्तीमार चाकू, तलवार, दांडा, दोर, मिर्ची पावडकर असे दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले.
हेही वाचा… नागपूर पोलिसांचा वचक संपला, युवकाच्या डोक्याला पिस्तूल लावून तक्रार मागे घेण्याची धमकी
योजना आखण्यासाठी एकत्रित
चेतन बरडे , शुभम डुमरे दोन्ही रा. नंदनवन झोपडपट्टी, सोनू ऊर्फ मोगली पाठक रा. जुने बगडगंज, वैभव डोंगरे रा. डायमंडनगर आपल्या अन्य ३ साथीदारांसह नंदनवन झोपडपट्टीत रेकॉर्डवरील आरोपी राजू शेंडेच्या घराजवळ दरोड्याची योजना आखत बसले होते. याबाबत माहिती मिळातच नंदनवन पोलिसांनी घेराव केला. चार आरोपींना ताब्यात घेतले. तर त्यांचे साथीदार डब्बा ऊर्फ निखिल वासनिक रा. जय भीम चौक, येडा ऊर्फ रोहन रंगारी रा. जुने बगडगंज आणि ब्यान्नव ऊर्फ करण रामटेके रा. पडोळेनगर हे तिघे पळून गेले. अटकेतील आरोपींकडून तलवार, लोखंडी रॉड, बेसबॉल स्टिक, मिर्ची पावडर असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.