नागपूर : नागपुरातील महाल परिसरात सोमवारी रात्री (१८ मार्च २०२५) दोन गटात संघर्ष पेटल्याने तणाव निर्माण झाला होता. जमाव नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यासह सौम्य लाठीमारही करावा लागला. या अश्रुधाराच्या नळकांड्याचा धूर भालदारपुरातील एका घरात शिरला. त्यामुळे एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्यांचा श्वास गुदमरल्याने एकाच खळबळ उडाली.
प्रकृती खालवलेली बालके ४ महिणे आणि सहा महिणे वयाची आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबची कबर हटवण्यासाठी सोमवारी नागपुरात केलेल्या आंदोलनानंतर रात्री आठ वाजताच्या सुमारास महाल परिसरात दोन गटात संघर्ष पेटला. जवळपास चार तास महाल परिसर, चिटणीस पार्क परिसर यासह अन्य ठिकाणी तुफान दगडफेक, तोडफोड, रस्त्यावर जाळपोळ आणि नारेबाजी करण्यात आली.
परिस्थितीवर नियंत्रणासाठी पोलिसांनी आटोकाट प्रयत्न केले. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या तर लाठीमार सुद्धा करावा लागला. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची असामाजिक तत्त्वांची धरपकड सुरू होती. दरम्यान अश्रुधुराच्या नरकांड्याचा धूर भालदारपुरातील एका घरात शिरला. घरात चार महिने आणि सहा महिने वयोगटातील मुले बिछाण्यावर खेळत होती. धुर नाका- तोंडात गेल्याने दोघांचाही श्वास गुदमरला. तातडीने कुटुंबियांनी त्यांना उपचारासाठी सक्करदरा परिसरातील डॉ. खळतकर रुग्णालयात दाखल केले. आता दोन्ही बालकांची प्रकृती स्थिर असून त्यांना निरीक्षणासाठी ठेवले असल्याची माहिती सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांनी दिली. दोन्ही बालकांना बुधवारी रुग्णालयातून सुट्टी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रकरण काय?
नागपुरातील महाल परिसरात एका गटातील युवकांनी पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनीही त्या गटावर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवला. हा सर्व प्रकार सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडला. याचा परिणाम शहरातील सामान्य जनजीवनावर झालेला आहे. शहराच्या काही भागात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. पोलिसांनी महाल-गांधी गेटकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यावर ‘बॅरिकेडींग’ करून मार्ग बंद करण्यात आले.
शासकीय रुग्णालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांचीही तत्परता
नागपुरातील मेयो या शासकीय रुग्णालयात महाल परिसरातील घटनेचे रुग्ण वाढत असल्याचे बघत प्रशासनाने तातडीने अतिरिक्त डॉक्टरांना पाचारण केले. येथे आवश्यक औषध व सर्जिकल साहित्य उपलब्ध करण्यात आले होते. डॉक्टरांनीही झटपट रुग्ण येताच त्यावर उपचार करून त्यांना दाखल करण्याचे काम सुरू केले. दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजतापर्यंत हा उपक्रम सुरू होता. शेवटी रुग्ण स्थिर झाल्यावर डॉक्टर घरी परतले.