अकोला : कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगारांनी पुन्हा गुन्हे करू नये म्हणून त्यांच्यावर सूक्ष्म नजर ठेवली जात असून विशेष खबरदारी घेतली जात आहे. या प्रकरणात गेल्या सव्वा वर्षात १९४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. समाजात दहशत पसरण्याच्या दृष्टीने कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगारांनी शक्तिप्रदर्शन केल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला. वाईट प्रवृत्तीमुळे अनेक लोक गुन्हेगारी कडे वळतात. चोरी, घरफोडी, जबरी चोरी, मारामारी, हत्या, फसवणूक अशा प्रकारचे गुन्हे सातत्याने समाजात घडत असतात. कायद्यानुसार गुन्हेगारांना कारागृहाची हवा देखील खावी लागते.

अनेक गुन्हे करून सुद्धा गुन्हेगारांची प्रवृत्ती बदलत नाही. दादागिरी, भाईगिरी, गुंडागर्दी करणारे काही गुन्हेगार कारागृहातून सुटल्यावर मिरवणूक काढणे, रस्त्यावर केक कापणे, असे प्रकार करतात. त्याचे रील बनवून समाजमाध्यमांतून प्रसारित केल्याचे विविध ठिकाणी आढळून आले आहे. या प्रकारावर आळा घालण्यासाठी कारगृह प्रशासन व अकोला पोलीस दलाने समन्वय ठेवुन शिक्षा भोगून कारागृहाबाहेर येणाऱ्या गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे

गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर सेलला विशेष ‘सायबर पेट्रोलिंग’च्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत. कारागृहातून गुन्हेगार सुटल्यावर त्याची तात्काळ नोंद घेऊन संबंधित पोलीस ठाण्याला माहिती दिली जाते. या गुन्हेगावरांवर विशेष लक्ष ठेऊन त्याने पुन्हा गुन्हा करू नये, यासाठी पोलीस ठाणे स्तरावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. सन २०२४ मध्ये मालमत्ता व शारीरिक गुन्हे करणाऱ्या व कारागृहातून सुटलेल्या १८१ गुन्हेगारांवर तसेच सन २०२५ मध्ये कारागृहातून बाहेर आलेल्या १३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.

पोलीस ठाणे स्तरावर ‘सीआरआयएसपी’ योजना

जिल्हा कारागृहातुन सुटणाऱ्या गुन्हेगारांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी अकोला जिल्ह्यामध्ये ‘सीआरआयएसपी’ योजना पोलीस ठाणे स्तरावर राबविण्यात येत आहे. त्यामध्ये गुन्हेगारांची तपासणी करून त्यांच्या हालचालीवर विशेष लक्ष ठेवण्यात येते. पोलीस ठाण्यांच्या स्तरावर ‘कोंबिंग’गस्तच्या माध्यमातून लक्ष ठेऊन आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येते. गुन्हेगारांकडून अशांतता प्रस्तापित करणारे कृत्य आढळून आल्यास तात्काळ ११२ नंबर वर माहिती द्यावी किंवा पोलीस ठाण्याशी संपर्क करावा. कायदा व सुव्यवस्था अबाधित करणाऱ्या गुन्हेगारांचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल, असा इशारा अकोला पोलीस दलाच्या वतीने देण्यात आला आहे.

Story img Loader