बुलढाणा : वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी आणि गंभीर घटनांचा जलदगतीने तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी धडक निर्णय घेतला आहे. आता ‘ऑन द स्पॉट एफआयआर’ दाखल होणार आहे. गंभीर घटनांत, पोलीस अधिकारी शासकीय वाहनांनी आणि तांत्रिक उपकरणांसह घटनास्थळी दाखल होऊन गुन्हे दाखल केले जाणार आहे. यासाठी सुसज्ज नियोजन करण्यात आले आहे.
स्थानिक पोलीस मुख्यालय परिसरातील प्रभा सभागृह येथे आज शनिवार, ५ एप्रिलला पोलीस विभागाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी ही घोषणावजा माहिती दिली. याप्रसंगी जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षकद्वय बि. बि. महामुनी (बुलढाणा), श्रणिक लोढा ( खामगाव) यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधताना पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी अभिनव उपक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले की, बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात मोबाईल किंवा गोपनीय माहीतीद्वारे दखलपात्र अपराध घडल्याची माहीती मिळाली की यंत्रणा तत्काळ कार्यान्वित होईल. गंभीर स्वरूपाची तक्रार मिळाली की लगेच संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि ‘डीबी’ पथकासह घटनास्थळी दाखल होणार आहे. लॅपटॉप, स्कॅनर असणारे प्रिंटर आदी तांत्रिक उपकरणे, साहित्य सरकारी वाहनाने घेऊन पोहचतील.
अधिकारी व कर्मचारी दखलपात्र अपराध घडल्या ठिकाणी जावून तक्रारदारांच्या तक्रारींची संगणकावर नोंद घेतील. तक्रारीचे प्रिन्ट काढून त्यावर तक्रारदाराची सही जागीच घेतील. तक्रारदारांनी दिलेली तक्रारींची प्रत ही स्कॅनरद्वारे पोलीस ठाण्याच्या ई-मेलवर पाठवतील. त्यामुळे जलदगतीने तपास होऊन गुन्हेगार पोलिसांच्या गळाला लागतील, असा आशावाद त्यांनी बोलवून दाखविला.
ऑन द स्पॉट एफआयआर योजना सरसकट सर्व किंवा किरकोळ तक्रारींसाठी नसणार आहे. गंभीर गुन्ह्यांसाठी असून महिला, बालक, ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. बालक, महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात या योजनेचा नक्कीच फायदा होणार आहे. ही योजना लोकाभिमुख असून पारदर्शक कारभारासाठी सुसंगत राहील, असेही पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.