नागपूर : इंग्लंड विरुद्ध भारत संघादरम्यान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील पहिला सामना गुरुवारी जामठा स्टेडियमवर रंगणार आहे. वाहतूक पोलिसांनी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी काटेकोर नियोजन केले आहे तर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्टेडियमवर दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. पोलीस आयुक्त स्वत: सुरक्षाव्यवस्थेची कमान सांभाळत आहेत, हे विशेष.
जामठा क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यासाठी नागपूर पोलिसांनी नियोजन केले आहे. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त अर्चित चांडक यांनी वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून दिशानिर्देश जारी केले आहेत. वाहतूक शाखेकडून जवळपास ६०० पोलीस कर्मचारी झिरो माईल चौक ते जामठा स्टेडियमपर्यंत तैनात राहणार आहेत. वाहतूक शाखेने डिजिटल मॅपसुद्धा जाहीर केला असून त्याचा उपयोग करुन गर्दी टाळण्याचे आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्तांनी केले आहे. स्टेडियमपासून एक किमी अंतरावर वाहनस्थळ आहे. तेथे सर्वच प्रकारच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. जामठा स्टेडियमकडे जाणाऱ्या वर्धा मार्गावरुन जड वाहतूक पोलिसांनी बंद केली आहे. तसेच वर्धा मार्गावर कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून रस्त्याच्या बाजुला पार्किंग न करण्याच्या सूचना केल्या आहेत.
ड्रोनद्वारे नजर
जामठा स्टेडियमवर पोलिसांनी ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पाच ड्रोन सज्ज ठेवण्यात आले असून क्रिकेटप्रेमी तसेच बेकायदेशिर कृत्य करणाऱ्यांवर पोलीस ड्रोनद्वारे लक्ष ठेवणार आहेत. तसेच वर्धा मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. वाहनांची गर्दी वाढताच वाहतूक पोलीस लगेच कृती करण्यासाठी ड्रोनचा वापर करणार आहेत.
स्टेडियमबाहेर पहारा
नागपूर शहर पोलीस दलातील जवळपास २ हजारांपेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांवर क्रिकेट सामन्यादरम्यान कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आहे. पोलिसांनी बुधवारपासूनच स्टेडियमचा ताबा घेतला. जामठा मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.
मेट्रो रात्री ११.३० पर्यंत
क्रिकेट चाहत्यांच्या सोयीसाठी महामेट्रोने ६ फेब्रुवारीला मेट्रोसेवा रात्री ११.३० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात ६ फेब्रुवारी (गुरुवार) रोजी विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा मैदानावर येथे एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. त्यासाठी मेट्रोसेवा न्यू एअरपोर्ट, खापरी मेट्रो स्टेशनपर्यंत तसेच सर्व मेट्रो स्टेशन्सपासून उपलब्ध असेल. शेवटची गाडी खापरी मेट्रो स्टेशनवरून ११.३० वाजता सुटेल. खापरीहून प्रवासी ऑटोमोटिव्ह स्क्वेअरपर्यंत प्रवास करू शकतील किंवा सीताबर्डी इंटरचेंजवर ट्रेन बदलून ॲक्वा लाईनच्या दिशेने प्रवास करू शकतील. मेट्रो दर १० मिनिटांच्या अंतराने दिवसभर धावतील. जामठा स्टेडियम न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपासून ७ किलोमीटर आणि खापरी मेट्रो स्टेशनपासून ६ किलोमीटर अंतरावर आहे. जामठा स्टेडियम आणि परत येण्यासाठी न्यू एअरपोर्ट स्टेशनवर महापालिकेच्या बसेस उपलब्ध असतील.