१०० टक्के राख वापराचे धोरण, तरीही नवीन अ‍ॅश पॉन्ड; ऊर्जामंत्र्यांच्या जिल्ह्यातील प्रकार

महेश बोकडे

नागपूर : औष्णिक विद्युत केंद्रातील राखेचा १०० टक्के वापर व्हायलाच हवा, असे केंद्र सरकारचे प्रत्येक धोरण असताही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या जिल्ह्यातील (नागपूर) खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राने मात्र नवीन नांदगाव अ‍ॅश पॉन्डमध्ये ही राख टाकणे सुरू केले आहे. यात आवश्यक नियमांची पायामल्ली झाल्याने स्थानिकांच्या आरोग्यासह भूजलातील पाणी प्रदूषित होण्याचा धोका आहे. 

महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राकडे पूर्वी वारेगाव अ‍ॅश पॉन्ड होते. हे पॉन्ड शंभर टक्के भरल्याचे सांगत खापरखेडा प्रकल्पाने सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी जागा अधिग्रहित केलेल्या नांदगावजवळच्या ७५० एकर परिसरात सुमारे २० किलोमीटरहून पाईपलाईन आणून त्यातून राख टाकणे सुरू केले आहे. हा अ‍ॅश पॉन्ड सुमारे ७५० एकर परिसरात आहे. त्यातच या पॉन्डमध्ये राख टाकण्यापूर्वी तेथे हायडेन्सिटी पॉली इथिलीन प्लास्टिक (एचडीपीई)चे आवरण  घालणे अनिवार्य आहे. त्यामुळे या अ‍ॅश पॉन्डमध्ये टाकलेली राख भूजलात जात नाही.  या नियमाला धाब्यावर बसवल्याचा आरोप करीत स्थानिक नागरिकांसह विविध सामाजिक संघटनांनी नुकतेच पर्यावरणमंत्री अदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. ठाकरे यांनी गंभीर दखल घेत तातडीने आकृतीबंद तयार करून उपाय शोधण्याचे आश्वासन दिले होते.  केंद्र सरकारचेच्या नुकत्याच आलेल्या नवीन धोरणानुसार, प्रत्येक वर्षी  या प्रकल्पांना १०० टक्के राखेचा वापर करायचा आहे. सोबतच गेल्या अनेक वर्षांपासून साठवलेल्या राखेपैकी प्रत्येकी १० टक्के राखेचा वापर दहा वर्षांत करून तिही संपवायची आहे. परंतु या धोरणाची पायामल्ली करत खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राने नवीन अ‍ॅश पॉन्ड तयार केला आहे. या विषयावर खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

प्रती टन १ ते दीड हजाराचा दंड केंद्राच्या नवीन धोरणानुसार, प्रत्येक वर्षी नवीन राखेचा १०० टक्के वापर करण्यासह जुना साठाही पुढच्या दहा वर्षांत संपवायचा आहे. त्यासाठी प्रत्येकवर्षी १० टक्के साठवलेली राख वापरायची आहे. त्याचा वापर न झाल्यास प्रती टन एक ते दीड हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या बैठकीत आलेल्या खापरखेडा प्रकल्पातील नवीन अ‍ॅश पॉन्डबाबतच्या आक्षेपांवर महानिर्मितीने उत्तर तयार करीत आहे. ते पुढील बैठकीत सादर करून शासनाच्या सूचनेनुसार काम केले जाईल. – संजय खंदारे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महानिर्मिती, मुंबई.

खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राला काही नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्या उत्तरानंतर नियमानुसार कारवाई केली जाईल.

– आनंद काटोले, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, नागपूर.

खापरखेडा प्रकल्पाने नवीन अ‍ॅश पॉन्डमध्ये एचडीपीईची फेंसिंग न करण्यासह बऱ्याच नियमांची पायामल्ली करत थेट पाणीमिश्रित राख टाकणे सुरू केले. या जागेवर आजही मोठय़ा संख्येने शेतकरी शेती करत असून जनावरांचा वावर आहे. त्यामुळे हे पाणी  शेतीत वापरल्यास व जनावरांनी पिल्यास त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. जवळच पेंच नदीसह पेंचचे जंगलही आहे. त्यामुळे नदी प्रदूषित होण्यासोबतच जंगली प्राण्यांच्या आरोग्याचाही प्रश्न आहे. 

– प्रताप गोस्वामी, सरचिटणीस, किसान मंच.

Story img Loader