नागपूर : राष्ट्रीय शिक्षण धोरण हे खऱ्या अर्थाने भारतीय शिक्षण धोरण आहे. शिक्षणाचे स्वरूप उद्देश आणि सार्थकता या धोरणात आहे. मेकॉलेने लादलेल्या शिक्षणाचा भाव बदलवून टाकणारे हे धोरण आहे, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे संघटनमंत्री मुकुल कानिटकर यांनी केले.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रामटेक येथील शिक्षणशास्त्र विभाग आणि ‘सेंटर फॉर आऊटरिच प्रोग्राम’ यांच्या संयुक्त विद्यमाने द्विदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्राच्या उद्घाटनाप्रसंगी कानिटकर बोलत होते. कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू मधुसूदन पेन्ना, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव उपस्थित होत्या. चर्चासत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध पैलूंवर मंथन करण्यात आले.
कानिटकर पुढे म्हणाले, संस्कृत विद्यापीठ हा ज्ञानाचा महासागर असून अन्य बहुशाखीय विद्यापीठांना मार्गदर्शन करण्याची भूमिका संस्कृत विश्वविद्यालयांनी स्वीकारली पाहिजे. संस्कृत ही प्राणविद्या असून भारतीय ज्ञानपरंपरेतील चिंतन विकसित करून ते विविध विद्यापीठांपर्यंत पोहचवल्यास या धोरणाचे सार्थक होईल. मातृभाषेतून शिक्षण हे तत्त्व या धोरणाने स्वीकारले असून विविध प्रादेशिक भाषा नवनवीन तांत्रिक शब्द व त्यांच्या अर्थासाठी संस्कृतकडेच मार्गदर्शन मागणार आहेत. उज्ज्वला चक्रवर्ती यांनी एसएनडीटी विद्यापीठाने केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. राष्ट्रीय शिक्षण धोरण हे समग्र असून भारताची अखंडता व एकता दाखवणारे आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, सर्वाना शिक्षण आणि भेदभावरहीत शिक्षण ही तीन वैशिष्टय़े या धोरणाची असून हे धोरणच भारताला विश्वगुरू बनवेल, असा विश्वास प्रो. दुर्गेश त्रिपाठी यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. पल्लवी कावळे यांनी तर आभार डॉ. अमोल मांडेकर यांनी मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा