चंद्रपूर : कोळसा, वाळू, तंबाखू, गुटखा, सुपारी, मद्य, अंमली पदार्थ तथा ऑनलाइन क्रिकेट सट्टा या अवैध व्यवसायांना मिळालेला राजकीय आश्रय आणि पोलिसांचा आशीर्वाद यातून चंद्रपूर जिल्ह्यात गुंडगिरी व गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. यातूनच जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांना ऊत आला आहे. आता तर हे गुन्हेगार थेट पोलिसांच्याच जीवावर उठले आहे. यातूनच दिलीप चव्हाण या पोलीस शिपायाला आपला जीव गमवावा लागला. राजकीय नेत्यांनी गुन्हेगारांना आश्रय देणे बंद करावे आणि पोलीस अधीक्षकांनी या गुन्हेगारांना वठणीवर आणावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आधी शांतताप्रिय अशी ओळख असलेल्या चंद्रपूर या औद्योगिक जिल्ह्यात मागील काही वर्षांत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांनी अशांतता निर्माण केली आहे. सिमेंट कारखाने, महाऔष्णिक वीज केंद्र, कोळसा खाणी, बल्लारपूर पेपर मिल व माता महाकालीची नगरी, अशी ओळख असलेल्या जिल्ह्याला आता गुन्हेगारांचा जिल्हा, अशी नवी ओळख मिळाली आहे. याला कारणीभूत स्थानिक राजकीय नेते आणि पोलीस अधिकारीच आहेत, अशी चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आहे. या दोन्ही शक्तिंच्या आशीर्वादानेच जिल्ह्यात २० ते ३० या वयाेगटातील तरुणांच्या गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. ‘रात्रीस खेळ चाले’ यानुसार जिल्ह्यात वेकोलिच्या खाणीतून कोळशाची तस्करी, अवैध वाळू उपसा, तंबाखू, गुटखा, सुपारी, मद्य, अंमली पदार्थ तस्करी आणि ऑनलाइन क्रिकेट सट्टा, असे अवैध व्यवसाय सुरू असतात.

पोलिसांनी एखाद्या गुन्हेगारावर कारवाई केली, तर राजकारणी त्याच्या मदतीला धावून येतात आणि राजकीय नेत्यांनी एखाद्या प्रकरणात तक्रार केली, तर अधिकारी आड मार्गाने मदत करतात, अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे. यातून अवैध व्यवसायाला बळ मिळते. परिणामी जिल्ह्यात हत्येचे प्रमाण वाढले आहे.

राजुरा येथे वर्षभरापूर्वी अशाच प्रकरणातून एका महिलेचा गोळीबारात मृत्यू झाला. रघुवंशी संकुल या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी जुलै २०२४ मध्ये मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्यावर गोळीबार झाला. बल्लारपुरात गुप्ता नावाच्या गुन्हेगाराने कापड दुकानावर पेट्रोल बॉम्ब फेकून व्यवसायिकाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. शिवसेना युवा नेते शिवा वझरकर हत्याकांड अवैध व्यवसायाच्या याच जीवघेण्या स्पर्धेतून घडले. बिनबा गेट येथे एका बिर्याणी सेंटरमध्ये कुख्यात गुंड हाजी शेख सरवर याची गोळीबार करून हत्या करण्यात आली. मूल येथे मुलीची छेड काढली या शुल्लक कारणावरून काही युवकाने एका युवकाची हत्या केली.

राजाश्रय मिळालेल्या युवकांचे गुन्हेगारीकरण झपाट्याने झाले आणि कमी वेळात पैसे कमावण्याच्या स्पर्धेत ते एकमेकांच्या जीवावर उठले. आता तर ही गुंडगिरी पोलिसांसाठीही जीवघेणी ठरत आहे. पोलीस शिपाई दिलीप चव्हाण यांची हत्या याच प्रकारातून झाली. तीन दिवसांपूर्वी शहरातील जटपुरा गेट येथे एका जिम संचालकाने पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केली. मागील काही दिवसांत पोलिसांवर हात उगारण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांना आता गमावलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवायची असेल तर गुंडांना ठेचून काढणे गरजेचे झाले आहे.

…अन्यथा चंद्रपूर जिल्ह्याचा बीडमार्गे बिहार प्रवास

पोलीस विभागाच्या नोंदीनुसार जिल्ह्यात खून, दरोडा, बलात्कार, विनयभंग, फसवणूक, अशा प्रकरणांत गुंतलेले ३५३ गुन्हेगार ‘मोस्ट वॉन्टेड’ आहेत. या पिसाळलेल्या गावगुंडांना, गुन्हेगारांना आणि अवैध व्यवसायांतून मातब्बर झालेल्या या टोळक्यांना वेळीच वठणीवर आणले नाही तर चंद्रपूरचा बीडमार्गे बिहार होण्यास वेळ लागणार नाही. यामुळे पोलीस अधीक्षकांनी ‘ॲक्शन मोड’मध्ये येत या गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.