उपराजधानीत दहीहंडी ‘फीवर’  ल्ल गोविंदा पथकांमध्ये उत्साह
गोविंदा आला रे आला.. असे म्हणत दरवर्षीप्रमाणे उद्या, शनिवारपासून विदर्भातील विविध शहरांमध्ये गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडी स्पर्धांसह, शोभायात्रा आणि विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, दहीहंडी स्पर्धेसाठी गोविंदा पथकांनी तयारी केली आहे. एकीकडे विदर्भासह मराठवाडय़ावर दुकाळाचे सावट असताना शहरातील विविध भागात दहीहंडी स्पर्धासाठी विविध सामाजिक आणि राजकीय पक्ष सरसावले असून, त्या निमित्ताने विदर्भात कोटय़वधी रुपयांची उलाढाल होते. जन्माष्टमीनिमित्त विदर्भातील विविध जिल्ह्य़ात मोठय़ा उत्साहात जन्माष्टमीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. पूर्वी काही शहरांमध्ये विशिष्ट सामाजिक संस्थाच्यावतीने ठराविक भागात दहीहंडी आणि जन्माष्टमीचे कार्यक्रम व स्पर्धेचे आयोजन केले जात असे मात्र गेल्या काही वर्षांत दहीहंडी स्पर्धेच्या निमित्ताने विविध राजकीय पक्ष सक्रिय झाले असून, जन्माष्टमीच्या पंधरा दिवस आधीच त्याची तयारी सुरू झालेली असते. शहरात त्यांच्या नावाने मोठमोठी होर्डीग लावली असून, लाखो रुपयाची या दहीहंडी स्पर्धेसाठी पारितोषिके ठेवण्यात आली आहे. २०१७ मध्ये महापालिका निवडणुका असून, त्या दृष्टीने विविध राजकीय पक्षाच्या प्रमुख कार्यकर्ते सक्रिय झाले आहे. शहरातील काही दंहीहंडय़ा विशिष्ट राजकीय पक्षाच्या नावाने ओळखल्या जात आहे. शहर आणि ग्रामीण भागात भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थानी जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला असून, दहीहंडी स्पर्धेची फलकबाजी कधीच सुरू झाली आहे. बडकस चौक, मानेवाडा, इतवारी, गोकुळपेठ, रवीनगर, अंबाझरी, वर्धमाननगर, नरेंद्रनगर, श्रीकृष्ण नगर, खामला, नंदनवन, सक्करदरा, वर्धमाननगर यासह रामटेक, काटोल आणि उमरेड गावांमध्ये दहीहंडीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या स्पर्धात कामठी, रनाळा, इतवारी, दहीबाजार आणि आसपासच्या खेडय़ातील अनेक चमू स्पर्धा जिंकण्यासाठी हिरीरीने सहभागी होत असतात. नागपूर जिल्ह्य़ात अधिकृत १२ गोविंदा पथके असली तरी अनेक संस्था या निमित्ताने एकत्र येऊन उत्सवात सहभागी होत असतात. यंदाही गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, एकाच वेळी दोन ते तीन ठिकाणी जाण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. भाजप आणि काँग्रेससह विविध पक्षाचे नगरसेवक आणि आमदारांनी आपल्या भागात स्पर्धा आणि महाप्रसादाचे आयोजन केले आहे. गेल्या महिन्याभरापासून ग्रामीण भागातील गोविंदा पथकानी रात्र जागवून उंच मानवी मनोरे रचण्याची तालीमही सुरू केली आहे. शहरातील काही मंडळानी १ लाखापासून ५ लाखांपर्यंतची दहीहंडी बांधण्याची घोषणा केल्याने गोविंदा पथकांनी तयारी केली आहे. परिणामी गोपालकाल्याच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्याची चुरस गोविंदा पथकांमध्ये दिसणार आहे.
महिला संघटनांचा सहभाग
इतवारी नवयुवक मंडळातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडी स्पर्धा आयोजित केली जात असून, विजेत्या पथकाला लाखो रुपयांची बक्षिसे दिली जातात. सोनेगावच्या जयदुर्गा क्रीडा मंडळाच्या महिलांनी यासाठी पुढाकार घेतला असून, शहरातील २५ महिलांच्या संघटना दहीहंडीमध्ये सहभागी होणार आहेत. संजय खुळे यांच्या नेतृत्वाखाली इतवारीमध्ये दहीहंडी स्पर्धा आयोजित केली असून, त्यात ५ लाख ५५ हजार रुपयांपासून विविध पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.  खामला सिंध माता मंडळातर्फे नगरसेवक प्रकाश तोतवानी यांच्या नेतृत्वात, श्रीकृष्ण नगरात भारतीय जनता युवा मोर्चातर्फे, महानगर बहुउद्देशीय संस्थेतर्फे टेलिफोन एक्सचेंज चौकात काँग्रेस नेते ज्ञानेश्वर झोडे यांच्या नेतृत्वाखाली, पारडी नाका येथे मुरलीधर सेवा समितीतर्फे आणि रवीनगर चौकाजवळ मरारटोली मैदानावर अजय पाटील दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यातील सर्वच मंडळांमध्ये एक लाखाच्यावर गोविंदा पथकांसाठी पारितोषिके ठेवण्यात आली असून, ती जिंकण्यासाठी गोविंदा पथके तयारीला लागली आहेत.
श्रीकृष्ण जन्मोत्सव शोभायात्रा
विश्व हिंदू परिषदेतर्फे उद्या शनिवारी सायंकाळी ५ वाजता वर्धा मार्गावरील गोरक्षण मंदिरातून श्रीकृष्ण जन्मोत्सव शोभायात्रा समितीतर्फे शोभायात्रा निघणार आहे. शोभायात्रेत भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित विविध चित्ररथ राहणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, महापौर प्रवीण दटके, दयाशंकर तिवारी, हेमंत जांभेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

Story img Loader