गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकत्व स्विकारल्यानंतर जिल्हावासियांसोबत भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, अवघ्या काही महिन्यातच त्यांचा भ्रमनिरास झाल्याचे चित्र आहे. विकासनिधी वाटपावरून सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राजकीय कुरबुरी सुरु असून भाजपच्या नेत्यांचीच कामे यातून वगळल्याने त्यांच्या गोटात अस्वस्थता पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, या यादीत सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांचा वरचष्मा दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाकडून जनसुविधेसाठी १९ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या कामाच्या वाटपावरून सत्ताधारी भाजप आणि शिंदेसेनेमध्ये अंतर्गत मतभेद होण्यास सुरवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद घेताना सह पालकमंत्री म्हणून शिवसेना शिंदे गटाचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना सह पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली. या घोषणेनंतर भाजप मधील अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. ती नाराजी आता खरी ठरत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकत्व घेतल्यानंतर पोलाद प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. त्यानंतर झालेल्या जिल्हा नियोजनाच्या बैठकीत देखील दोन्ही पालकमंत्री आभासी पद्धतीने उपस्थित होते. तेव्हापासून फडणवीस हे जिल्ह्यात आलेले नाही. वेळोवेळी सहपालकमंत्री जयस्वाल बैठका घेत असतात. नुकत्याच मंजूर झालेल्या जनसुविधेच्या कामात भाजप नेत्यांच्या अनेक कामांना वगळण्यात आले. तर शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना तसेच खाजगी कंत्राटदारांना झुकते माप देण्यात आल्याने भाजपच्या गोटात नाराजी आहे. मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री असताना भाजपच्याच पदाधिकाऱ्यांची गळचेपी होत असल्यास आम्ही कुणाकडे जावे, असा सवाल भाजपचे नेते उपस्थित करीत आहे. त्यामुळे येत्या काळात सहपालकमंत्र्यावरून राजकीय वाद पेटण्याची चित्र आहे.

खाजगी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची मनमानी

जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून बाहेरील खाजगी कंत्राटदारांची रेलचेल वाढली आहे. मंत्र्यांची नावे सांगून ही मंडळी मोठं मोठी कामे आपल्या पदरात पाडून घेत आहेत. अनेकांनी शेकडो कोटींची निकृष्ट कामे करून कोट्यवधीचा घोटाळा देखील केला आहे. यात त्यांना काही अधिकाऱ्यांची साथ मिळत असल्याने कागदोपत्री सर्व योग्य असल्याचे दाखविण्यात येत आहे. या कामाच्या यादीत देखील जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याने मोठा घोळ केल्याची चर्चा आहे. मागील काही वर्षांपासून हा अधिकारी स्वतःच अनेक विकास कामाची विल्हेवाट लावीत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करीत आहे. त्यामुळे बाहेरील कंत्राटदार आणि या अधिकाऱ्यांच्या मनमानीवर पालकमंत्री देवेंद्र फडणवीस चाप बसाविणार काय, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.