तर्क वितर्कोना उधाण; भाजपला पाठिंबा, शिवसेनेची कोंडी!
सत्तेच्या राजकारणात भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका घेऊन शिवसेनेची कोंडी करणे आणि दुसरीकडे दुष्काळाच्या मुद्यावर भाजप सरकारविरुद्ध आंदोलन करून दिल्लीत मोदींची भेट घेणे, अशा परस्परविरोधी भूमिकांमुळे चर्चेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विदर्भ दौरा नेमका कशासाठी, यावरून तर्कवितर्क केले जात आहेत. मराठवाडय़ाच्या दुष्काळी भागातील पवार यांचा दौरा त्या भागातील कमी झालेली पक्षाची ताकद पुन्हा वाढविण्यासाठी होता, हे समजण्यासारखे आहे, पण विदर्भात तशी स्थिती नाही. विदर्भात मराठवाडय़ाइतकी दुष्काळाची तीव्रता नाही आणि या भागात पक्ष वाढण्याची शक्यताही सध्या नाही, या पाश्र्वभूमीवर पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यवतमाळ जिल्ह्य़ाचा दौरा करणे व त्यानंतर नागपुरात येऊन कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला वेळ देणे, याबाबत राजकीय क्षेत्रात चर्चा आहे.
शेतकरी आत्महत्या आणि स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी हे दोन मुद्दे विदर्भात गाजणारे आहेत. या दोन्ही मुद्यांवर त्यांची भूमिका नेहमीच गुळमुळीत राहिलेली आहे. तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी केलेल्या कर्जमाफीचा लाभ विदर्भापेक्षा पश्चिम महाराष्ट्रालाच अधिक झाल्याने या भागातील शेतकऱ्यांची पवार यांच्यावर नाराजी आहे. सिंचनाचा अनुशेष व या कामात विदर्भात झालेला गैरव्यवहार यासाठी राष्ट्रवादीच्याच नेत्यांवर आरोप झाले आहेत. दुसरीकडे विदर्भाच्या मुद्यावरही पवार यांनी अनेकदा ‘यू’ टर्न घेतल्याने ते स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने आहे की विरोधात, हे स्पष्टच होत नाही. वेळोवेळी घेतलेल्या संदिग्ध भूमिकांमुळे विदर्भवादीही त्यांच्यावर नाराज आहेत. या पाश्र्वभूमीवर पवार २२ ते २४, असे तीन दिवस विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते २३ सप्टेंबरला यवतमाळ जिल्ह्य़ाला भेट देणार असून दुसऱ्या दिवशी (ता.२४) नागपुरात पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याच दिवशी ते बॅ. वानखेडे जन्मशताब्दी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्रीही निमंत्रित आहेत.
पक्षस्थापनेपासून जाणीवपूर्वक प्रयत्न करूनही विदर्भात राष्ट्रवादीची शक्ती वाढू शकलेली नाही. पक्षाची सूत्रे अजित पवार यांच्याकडे गेल्यावर जुनी नेते मंडळी पक्षापासून दूरवली होती. या दौऱ्याच्या माध्यमातून त्यांच्याशी ‘संवाद’ साधण्याचा पवार यांचा प्रयत्न असेल, असे मानले जाते.
पवार यांचे राजकारण जवळून पाहणारे आणि ते समजून घेणाऱ्यांच्या मते पवार यांचा दौरा केवळ शेतकऱ्यांची भेट व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यापुरता मर्यादित नाही. विदर्भात येऊन ते स्थानिक मुद्यांना हात घालण्याचा प्रयत्न करतील. मात्र, शेतकरी आणि स्वतंत्र विदर्भ या दोन्ही मुद्यांवर त्यांना जनतेची सहानुभूती मिळण्याची शक्यता कमी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यवतमाळमधील शेतक ऱ्यांसाठीच- अनिल देशमुख</strong>
राष्ट्रवादीचे विदर्भातील नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी मात्र ही बाब फे टाळून लावली आहे. त्यांचा दौरा के वळ यवतमाळ जिल्ह्य़ातील शेतक ऱ्यांच्या भेटीसाठी आहे. तीन गावांना ते भेटी देणार असून तेथील आत्महत्या क रणाऱ्या शेतक ऱ्यांच्या कु टुंबाना ते भेटणार आहेत. नागपुरात असल्याने मेळाव्यात ते उपस्थित राहणार आहेत. नागपूरचा मेळावा हा पक्षबांधणीच्या प्रयत्नाचा एक भाग असला तरी यवतमाळ जिल्ह्य़ाच्या दौरा के वळ शेतक ऱ्यांसाठी आहे, असे त्यांनी ‘लोक सत्ता’शी बोलताना सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politics over sharad pawar vidarbha visit
Show comments