|| राम भाकरे
दंडाची भीती व महापालिकेच्या जनजागृतीचाही परिणाम
प्लास्टिकबंदीचा चांगला परिणाम शहरात दिसायला लागला आहे. या बंदीमुळे कचऱ्यातील प्लास्टिकचे प्रमाण अर्ध्यावर आले आहे. दंडाची भीती व महापालिकेच्या जनजागृतीमुळेही प्लास्टिकबंदीच्या मोहिमेला मोठे बळ मिळाले आहे.
प्लास्टिकबंदी होण्यापूर्वी शहरातील विविध भागातून रोज गोळा करण्यात आलेल्या ओला व सुका कचऱ्यात ३० ते ३२ टन प्लास्टिक असायचे. मात्र, प्लास्टिकबंदी लागू झाल्यानंतर त्याचे प्रमाण १५ टन इतके कमी झाले आहे. आधीच्या कचऱ्यामध्ये नुसत्या प्लास्टिक पिशव्या दिसायच्या. आता मात्र अपवादानेच प्लास्टिक दिसते. प्लास्टिक पिशव्या नष्ट होत नसल्याने त्यांचा पर्यावरणावर विपरीत परिणाम व्हायचा तसेच त्या नाल्यांमध्ये अडकून वाहत्या पाण्याला अडथळा निर्माण व्हायचा. त्यामुळे शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदीचा निर्णय घेतला. याबाबत महापालिकेच्या वतीने जनजागृती करण्यात आली. सोबतच शहरात गेल्या आठ महिन्यात ७०० टन प्लास्टिक जप्त करण्यात आले. या सर्व प्रयत्नांचा चांगला परिणाम आता दिसायला लागला आहे. कचऱ्यातील प्लास्टिकचे प्रमाण कमी झाले आहे. पूर्वी शहरातून दररोज ३०ते ३२ टन प्लास्टिक जमा होत होते. भांडेवाडीमध्ये हा कचरा साठवला जात असताना त्यातून प्लास्टिक वेगळे करणे अडचणीचे झाले होते. ही अडचणही आता बऱ्याचअंशी दूर झाली आहे.
ग्राहकांकडून कापडी पिशव्यांची मागणी होत असल्याने आम्हाला या पिशव्या ठेवाव्या लागतात. ‘प्लास्टिकची पिशवी मागू नका’ अशी पाटी लावली तरी ग्राहक मागणी करतातच. अशावेळी या कापडी पिशव्या कामी पडतात. शेवटी ग्राहक परत जाऊ नये, हा आमचा उद्देश असतो. – राजेश पत्राळे, भाजी विक्रेता
आता प्रत्येक वस्ती अभियान राबवणार
महापालिकेच्यावतीने शहरात प्लास्टिकबंदी अभियान राबवले आणि विविध गोदामातून सुमारे ७०० टन प्लास्टिक जप्त केले. शिवाय प्रत्येक प्रभागात जनजागृती सुरूच आहे. – दिलीप कांबळे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता)
झोननिहायगोळा
होणारे प्लास्टिक (टन)
- लक्ष्मीनगर २
- धरमपेठ २
- हनुमाननगर १
- धंतोली २
- नेहरूनगर २
- गांधीबाग २
- सतरंजीपुरा २
- लकडगंज १
- आशीनगर १
- मंगळवारी १