प्रमोद खडसे
वाशीम : पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडील अन्न व औषध प्रशासन खाते काढून त्यांना मृद व जलसंधारण खात्याचे मंत्री करण्यात आले आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटप जाहिर झाल्यानंतर राज्यातील पालकमंत्री बदलण्याचे संकेत दिले आहेत. संजय राठोड यांनी वाशीमच्या पालकत्वाची जबाबदारी स्विकारल्यानंतर कायमच त्यांनी वाशीमकडे दुर्लक्ष केले असून त्यांच्याविषयी जिल्हयात प्रचंड नाराजी असून जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होईल. यावरून तर्क वितर्क लावले जात आहेत.
प्रशासकीय व्यवस्था गतीमान होऊन सामान्य जनतेला वेळेत न्याय मिळावा, शासकीय योजनांची प्रभावीपणे अमंलबजावणी व्हावी, प्रशासनावर सरकारचा अंकुश रहावा यासह विविध कारणास्तव विधिमंडळ शासकीय व्यवस्थेमध्ये मंत्रीमंडळातील मंत्रयाना जिल्हयाच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात येते. वाशीम जिल्हयाच्या पालकत्वाची जबाबदारी शिंदे फडणवीस सरकारमध्ये संजय राठोड यांच्याकडे सोपविण्यात आली होती. ते शेजारील जिल्हयातील असल्यामूळे वाशीमला वेळ देऊ शकतील, अशी जिल्हावासीयांना आशा होती. मात्र जिल्हावासीयांची आशा फोल ठरली आहे.
त्यापुर्वी महा विकास आघाडी सरकार मध्ये जिल्हयाला लाभलेले सातारचे सुपुत्र शंभुराज देसाई यांच्याकडे पालकत्वाची जबाबादारी होती. मात्र ते देखील झेंडा टू झेंडाच जिल्हयात फिरकायचे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सहभागी झाल्यानंतर नव्याने मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. मंत्रयांना खातेवाटप देखील जाहिर झालेले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पालकमंत्री बदलाचे संकेत दिले असल्याने जिल्हा वासियांच्या आशा पल्लवित झाल्या असून जिल्ह्याला वेळ देईल असाच पालकमंत्री देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.