लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बनावट नोटा बाळगल्या आणि बाजारात तस्करी केल्याच्या प्रकरणात आरोपींच्या जामीन अर्जावर निर्णय घेताना महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. आरोपीला जामीन मंजूर करताना न्यायालयाने म्हटले की, अशा प्रकरणात आरोपीची गुन्हेगारी प्रवृत्ती सिद्ध करणे आवश्यक आहे. न्यायालयाने असेही म्हटले की, बनावट नोटा वापरताना, संबंधित आरोपींनी गुन्हेगारी मानसिकतेने किंवा कोणत्या हेतूने काम केले हे कोणत्याही संशयाशिवाय सिद्ध करणे आवश्यक आहे. न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींची जामीनावर मुक्तता केली.

काय आहे प्रकरण?

प्रमोद किसान गाडगे हे जामिनावर सुटलेल्या आरोपीचे नाव आहे. ४ मार्च २०२४ रोजी यवतमाल जिल्ह्यातील जरी जामनी तालुक्यातील घोंसा येथे १०० रुपयांची बनावट नोट देताना एक पानवाला रंगेहाथ पकडला गेला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून १००,२०० आणि ५०० रुपयांच्या एकूण ५७०० रुपयांच्या ३६ बनावट नोटा सापडल्या. पोलिसांनी भादंवि कलम ४८९ अंतर्गत गुन्हा दाखल केला. जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर आरोपींनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

आणखी वाचा- “ही तर जुनी बातमी, त्यात नवीन काय?” फडणवीस कोणाबाबत बोलले?

आरोपीचा हा युक्तिवाद

न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. आरोपींच्या वकिलांनी सांगितले की, आरोपी हा सामान्य माणूस आहे आणि त्याला खऱ्या नोटा आणि बनावट नोटांची माहिती नाही. त्यांनी या चलनी नोटाची निर्मिती केली तसेच वितरित केल्या नाहीत. त्यांनी केवळ या चलनी नोटा प्राप्त केल्या आणि त्यांचा वापर केला आहे. त्याच्या प्रसाराचा विचार केला तर तपासादरम्यान कोणतीही सामग्री गोळा करण्यात आलेली नाही. आरोपीविरुद्ध प्रथमदर्शनी कोणताही खटला तयार होत नाही, त्यामुळे त्याला जामिनावर सोडण्यात यावे. दुसरीकडे, सरकारने आरोपींच्या जामीन अर्जाला विरोध केला.

आणखी वाचा-माथेफिरूचे भयंकर कृत्य… नागपूर रेल्वे स्थानकात प्रवाशांवर हल्ला; दोन ठार, दोघे जखमी

न्यायलयाचा निर्णय काय?

सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निर्णय दिला की, आयपीसीच्या कलम ४८९बी अंतर्गत गुन्ह्याच्या व्याख्येनुसार आरोपींविरोधात कोणतेही संशय न घेता आरोप सिद्ध करावे लागतात. आरोपींनी या बनावट नोटांचा वापर गुन्हेगारी हेतूने केला होता हे सिद्ध करणे आवश्यक आहे. या प्रकरणाचा तपास याचिकाकर्त्याविरुद्धचे आरोप वाजवी संशयाच्या पलीकडे सिद्ध करत नाही. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला. आरोपींच्या वतीने वकील मकरंद आचरे यांनी युक्तिवाद केला.