नागपूर : राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाची शक्यता असून मंगळवारी गणरायाचे आगमनदेखील पावसातच होणार आहे. सध्या राज्यातील अनेक भागांत पाऊस सुरू आहे आणि सर्वत्र श्रींच्या प्रतिष्ठापनेची तयारी सुरू आहे. दरम्यान मंगळवारी गणरायाच्या आगमनाला पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. प्रामुख्याने पुणे शहर, मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात मंगळवारी पाऊस असणार आहे.
हेही वाचा – नागपूर : रेल्वेने घेतला बिबट्याचा बळी
हेही वाचा – नर्मदेच्या पुरात नागपूरच्या डॉक्टरसह पाचजण अडकले, नितीन गडकरींनी केली मदत
राज्यातील जवळपास सर्वच भागांत मध्यम पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुढील पाच दिवस पाऊस कायम असणार आहे. मात्र, हा पाऊस मुसळधार नाही तर पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आता कमी झाली आहे. आग्नेय राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता नाही. रविवारी मात्र राज्यातील काही भागांत पाऊस झाला. आता सोमवारी नाशिक, नंदुरबारमध्ये पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ तर धुळे, रायगड, पालघर, पुणे जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ दिला आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे.