चंद्रपूर : फेब्रुवारी महिना संपण्यास आणखी आठवडाभराचा अवधी असला तरी चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. यंदा तीव्र पाणी टंचाईची झळ बसेल, असा इशारा भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाने दिला आहे. १०८.४५ टक्के पाऊस झाला असला तरी नऊ तालुक्यांतील भूजलपातळीत घट झाल्याने ग्रामीण भागात पाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान एक हजार ४० मि.मी. आहे. २०२२-२३ यावर्षी जिल्ह्यात ११२० मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसाची टक्केवारी १०८.४५ इतकी आहे. पर्जन्यमानात वाढ झाली असली तरी नऊ तालुक्यांतील भूजलपातळीत घट झाली असल्याचे निरीक्षण भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने नोंदविले आहे. यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – नागपूर : चोरी करण्यापूर्वीच चोरट्यांच्या हातात बेड्या, झाले असे की…

हेही वाचा – नागपूर : राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने उपराजधानीत गुटखा-तंबाखू तस्करी, वाडीत ५५ लाखांचा गुटखा जप्त

जिल्ह्यात १३४ निरीक्षण विहिरी आहेत. जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबर महिन्यांत या निरीक्षण विहिरीतील पाण्याच्या पातळीची नोंद घेतली जाते. यात सप्टेंबर महिन्यातील पाण्याच्या पातळीची नोंद महत्त्वाची असते. या महिन्याच्या नोंदीनुसार, जिल्हा प्रशासनाकडून टंचाईचे आराखडे तयार केले जातात. सप्टेंबर महिन्यात पाण्याच्या पातळीत घट झाल्याचे निरीक्षण भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने नोंदविले आहे. त्यात बल्लारपूर, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, मूल, सावली, चिमूर, ब्रह्मपुरी, नागभीड आणि जिवती तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे या तालुक्यांत पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Possibility of water shortage in chandrapur district decline in ground water level in nine taluka rsj 74 ssb