अकोला : भडकावू भाषणाची चित्रफित व विचार समाज माध्यमातून प्रसारित होऊ नये, यासाठी आक्षेपार्ह व जनप्रक्षोभक ‘पोस्ट’ प्रसारित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. नुपूर शर्मा प्रकरणाची कोणतीही अशी ‘पोस्ट’ प्रसारित केल्यास भारतीय दंड संहितेचे १८६० चे कलम ५०५,१५३ अ, ११६ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे, तसे आदेश जिल्हा अपर दंडाधिकारी प्रा.संजय खडसे यांनी निर्गमित केले आहेत. जिल्ह्याचे वातावरण सलोख्याचे राहावे, यासाठी हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देश-विदेशात त्याचे पडसाद उमटले. यामुळे धार्मिक तेढ निर्माण झाला. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलने झाली. उदयपूर येथे सर्वसामान्य व्यक्तीची गळा चिरून केलेली हत्या व अमरावती येथील घटनेचे छायाचित्र समाज माध्यमावर प्रसारित करण्यात आले आहेत. नुपूर शर्मा विरोधात विविध लोकांचे भडकाऊ भाषणाचे चित्रफितसुद्धा समाज माध्यमावर प्रसारित करण्यात आले आणि नुपूर शर्माचे समर्थनार्थ पण काही घोषणा, घोषवाक्य प्रसारित करण्यात आले आहेत. या घटनेमुळे दोन्ही समाजातील युवकांमध्ये एक प्रकारे विध्वंसक विचार या चित्रफिती व भाषणामुळे बळावत चालले आहे. त्यामुळे समाजात दुहीचे वातावरण निर्माण होत आहे. संवेदनशील जिल्हा म्हणून अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या दृष्टीने नुपूर शर्मा संबंधाने समाज माध्यमावर कोणत्याही प्रकारच्या पोस्ट, भडकावू भाषणे, आक्षेपार्ह बाबी प्रसारित करणे भारतीय दंड संहिता १८६० कलम ५०५,१५३ अ, ११६ नुसार दंडनीय अपराध आहे. या बाबी प्रसारित करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी जारी केले आहेत.