बुलढाणा : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर बुलढाण्यात ‘पोस्टर’वॉर सुरू झाले आहे. मवाळ समजल्या जाणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या जयश्री शेळके यासुद्धा या अघोषित प्रचार व वातावरण निर्मितीच्या ‘युद्धात’ अपवाद ठरल्या नाहीये! त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शेकडोच्या संख्येने शुभेच्छा फलक लागले आहे. यामुळे पक्षांतर्गत व विरोधी प्रतिस्पर्धी सावध झाले आहे.
काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा शहरासह मतदारसंघात भव्य शुभेच्छा फलक लागले आहेत. यातही जंगी आकाराचे हे फलक ७ मे पासूनच लागल्याने त्याची अधिकच चर्चा रंगली आहे. बुलढाणा विधानसभेचा केंद्रबिंदू असलेल्या शहरातील मुख्य चौक, रहदारीच्या मार्गासह बुलढाणा व मोताळा तालुक्यातील मोठ्या गावांत हे फलक लागले आहे. राजकीय क्षेत्रात ‘ताई’ नावाने परिचित यांचा यंदाचा वाढदिवस जास्तच उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आज दिवसभर विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुलढाणा शहर ते तालुक्यातील पाडळी ते मोताळा तालुक्यातील मुख्य गावात नियोजनपूर्वक हे आयोजन करण्यात आले. बुलढाणा ते वाघजळ फाटादरम्यान आयोजित दुचाकी रॅली शक्ती प्रदर्शनाचा भाग मानल्या जात आहे.
हेही वाचा – “मोचा” चक्रीवादळाची आज वर्दी; विदर्भातील “या” जिल्ह्यांना बसणार फटका, वाचा सविस्तर…
आता थांबणे नाही…
मागील बुलढाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीने ऐनवेळी हुलकावणी दिली. मात्र पक्षाचा निर्णय मान्य करून शेळकेंनी माघार घेतली. मात्र आता कोणत्याही परिस्थितीत ‘थांबायचे नाही’ असा जयश्री शेळके आणि ‘शाहू परिवार’चा ठाम निर्धार आहे. महाविकास आघाडीमुळे आता अन्य ‘पर्याय’सुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे कधी नव्हे ते जंगी शक्तिप्रदर्शन करून वातावरण निर्मितीचा हा प्रयत्न आहे.
सर्व सावध
यामुळे बुलढाणा मतदारसंघातून इच्छुक संजय राठोड गट, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ समर्थक सावध झाले आहे. शाहू परिवाराशी फारसे सख्य नसलेले जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रेदेखील या शक्तिप्रदर्शनावर लक्ष ठेवून आहे. पक्षांतर्गत प्रतिस्पर्धीच नव्हे तर ‘पुढील लढत ताईसोबत’ याची खात्री असलेले शिंदे गटाचे धूर्त आमदार संजय गायकवाड, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख व इच्छुक उमेदवार जालिंदर बुधवत, तूर्तास भाजपात असलेले माजी आमदार विजयराज शिंदे हे बारकाईने नजर ठेवून आहेत.