नागपूर : सर्वात गजबजलेल्या सदर मंगळवारी बाजार उड्डाणपुलावरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असून तेथे वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. या पुलाच्या देखभाल-दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची ओरड आहे.
सदर-मंगळवारी बाजारापासून कामठी रोडकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक असते. बाजार परिसर आणि शासकीय कार्यालयांमुळे पुलाचा वापर करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मालवाहतूक करणारी वाहने या पुलावरून मोठ्या संख्येने जातात. तसेच कामठी, मेकोसाबाग, जरीपटका, मोमीनपुरा, इंदोरा आणि टेका नाका या परिसरातून सदरमध्ये येण्यासाठी प्रामुख्याने सदर बाजार उड्डाण पुलाचा वापर केला जातो. मात्र, या उड्डाण पुलावरील डांबर रस्ता उखडलेला आहे. पुलाच्या मधोमध रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे तेथून जाणाऱ्या वाहनांची गती मंदावते. तसेच पुलावर दुभाजक नसल्यामुळे वाहनामध्ये ‘ओव्हरटेक’ करण्याची चढाओढ लागलेली असते. यामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांची धडक होण्याचा धोका असतो. पुलाच्या समोरील रस्त्यावर दुभाजक तुटलेले असल्यामुळे अनेक वाहनचालक समोरून वळण न घेता तुटलेल्या दुभाजकावरून वाहने वळवतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावते.
आणखी वाचा-अकोला : जाहीर सभांमधून प्रचाराचा धुरळा! स्टार प्रचारक, भेटीगाठी, मेळावे, कॉर्नर सभा, जेवणावळी…
अतिक्रमणाचा विळखा
उड्डाण पुलावर चढताना मंगळवारी बाजार चौकात रस्त्यावरील हातठेले, भाजी विक्रेते आणि फळ विक्रेते मोठ्या प्रमाणावर बसतात. बाजाराच्या दिवशी तर उड्डाण पुलावरून वाहतूक करणे जिकरीचे असते. रस्त्याच्या आजूबाजूला ऑटो उभे असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होते. या पुलाच्या देखरेखीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
उड्डाण पुलाची ‘लँडिंग’ चुकली
उड्डाण पूल बांधताना ‘लँडिंग’ चुकल्याचे प्रामुख्याने लक्षात येते. पुलाची ‘लँडिंग’ कडबी चौकात आहे. तेथे सिग्नलवर वाहने थांबल्यानंतर थेट वाहनांची गर्दी उड्डाण पुलापर्यंत जाते. त्यामुळे सायंकाळी चौकापासून ते पुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे अनेकदा पुलावरील संपूर्ण वाहतूक ठप्प होते.
अरुंद रस्ते आणि मॉलमुळे वाहतूक कोंडी
उड्डाण पुलाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्यातही पुलाच्या उजव्या आणि डाव्या बाजूने जाणारे दोन्ही रस्ते अरुंद आहेत. त्या रस्त्यावरून शाळांच्या बसेस, व्हॅन आणि ऑटोची मोठी गर्दी असते. तसेच कडबी चौकापूर्वीच दोन मोठमोठी मॉल आहेत. तेथील ग्राहकांची वाहने रस्त्यावरच उभी असतात. त्यामुळे कडबी चौकातील वाहनांची गर्दी पुलापर्यंत पोहचते. वाहतूक पोलिसांनी या समस्यांवर तोडगा काढणे गरजेचे आहे.
आणखी वाचा-ज्येष्ठ गांधीवादी धीरूभाई मेहता यांचे निधन; कस्तुरबा हेल्थ सोसायटी झाली पोरकी
पुलावरचा रस्ता खराब असल्यामुळे वाहन हळू चालवावे लागते. सदर बाजारातून पुलाकडे जातानाच वाहनांची गर्दी असते. तसेच पूल पार केल्यानंतर कडबी चौकातसुद्धा नेहमी वाहतूक कोंडी असते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी यावर तोडगा काढावा. -सविता जगताप (विद्यार्थिनी)
मंगळवारी बाजारामुळे नागरिक आणि वाहनांची गर्दी असते. वाहतूक पोलीस त्या भागातील वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. तसेच चौकात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात येतील. -प्रशांत अन्नछत्रे (प्रभारी, पोलीस निरीक्षक, सदर वाहतूक शाखा)