परदेशी विद्यार्थी शास्त्रशुद्ध प्रशिक्षणासाठी गावात
आधुनिक युगात पारंपरिक कला लोप पावत असताना नागपूरपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘पेठ’ या गावातील एका कुटुंबाने नव्हे तर संपूर्ण गावाने कुंभार कला जिवंत ठेवली आहे. या गावातून मातीपासून तयार होणाऱ्या कलाकृती दुबई, ऑस्ट्रेलिया आदी देशांपर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत. एवढेच नव्हे तर विदेशातील विद्यार्थी या गावातील कुंभार कलेच्या प्रेमात पडले आणि आता शास्त्रशुद्ध प्रशिक्षणासाठी ते खंडारे कुटुंबीयांकडे येत आहेत.
शेकडो वर्षांचा इतिहास या गावातील कुंभारकलेला आहे. तब्बल ४०० ते ५०० वर्षांपासून या गावातील सुमारे ३०-३५ घरे कायम मातीच्या दिव्यांपासून तर मातीची भांडी आणि कलाकुसरीच्या वस्तू तयार करतात. त्यांचा संपूर्ण घरप्रपंच या कलेवर आहे आणि आता नवीन पिढीसुद्धा या कामाकडे वळली आहे. सुरुवातीला या गावात फक्त दिवेच तयार होत होते, पण विकास हवा असेल तर बदल करणे आवश्यक आहे आणि म्हणून त्याही पलीकडे जाऊन इतर कलाकृती तयार करण्यास सुरुवात झाली. त्यातच या गावातील मोतीराम खंडारे यांच्या कुटुंबीयांनी आणखीच मोठी झेप घेतली.
पारंपरिक ते अत्याधुनिक अशी झेप घेणाऱ्या या कुटुंबाने परंपरेला मात्र कुठेच तडा जाऊ दिला नाही. मोतीरामजींचे शिक्षण फारसे नाही. काही कार्यक्रमाच्या निमित्ताने कोलकाता, आसाम राज्यातील मुली या गावात आल्या आणि मोतीरामजी यांच्याशी त्यांची भेट झाली. दिव्यांमध्ये एवढी कला तर इतर वस्तू का तयार करत नाहीत, असा प्रश्न त्यांनी मोतीरामजींना केला. पुढच्या भेटीत त्यांनी त्यांच्याकडील मातीच्या वस्तू इकडे आणल्या. त्याच्या निर्मितीसाठी मार्गदर्शनही केले. येथून खंडारे कुटुंबीयांसोबत गावाच्या प्रगतीचा प्रवास सुरू झाला. कुंभारकामातील या गावातील प्रमुख व्यक्तिमत्त्व मोतीराम खंडारे यांनी वयाची बंधने झुगारत नवी कला आत्मसात करण्यासाठी प्रदर्शनांच्या प्रत्येक ठिकाणी भेट दिली. कित्येक कार्यक्रमातून ते स्वत: फिरले आणि नवे ते सर्व शिकण्याचा प्रयत्न त्यांनी केला. चिनीमाती, सिरॅमिकपासून जेवढी भांडी आणि कलात्मक वस्तू तयार होतात, त्या सर्व त्यांनी मातीपासून तयार केल्या. त्यामुळे नागपूरातील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात लागणाऱ्या प्रदर्शनातून नवी कला आत्मसात करणाऱ्या मोतीरामजींना आता प्रशिक्षणासाठी या केंद्रात आमंत्रित केले जाते. अर्थातच त्यांच्या मुलानेही त्यांचा हा वारसा जपला आहे. प्रमोददेखील त्यांच्यासोबत तर कधी स्वत: विविध प्रदर्शनांमध्ये हजेरी लावतो. नवी दिल्ली, बंगलोर या ठिकाणी आयोजित आंतरराष्ट्रीय महोत्सवात प्रमोदने त्यांच्या कामाची मोहर उमटवली.
खंडारे कुटुंबाने परंपरेसोबतच आधुनिकतेची कास धरून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. मात्र, गावातील इतर मंडळी याच कामात असली तरीही खंडारे कुटुंबाइतके त्यांनी अजूनही अत्याधुनिक तंत्रज्ञान स्वीकारलेले नाही. या गावात कधीही गेले तरी धुवून वाळत टाकलेली माती, फिरणाऱ्या चाकावर वस्तू घडवणारे हात, घरात तयार झालेल्या वस्तू असे सर्व कार्यक्रम बाराही महिने सुरू दिसतो.
- वनखात्याचे नियम बदलले आणि जंगलातल्या मातीवरचा हक्कही काढून घेण्यात आला. आधी वनखात्याकडून माती मिळायची. ती माती मिळणे आता बंद झाले आहे. त्यामुळे तलावाजवळची रेतीमिश्रित माती आणून त्यापासून मातीच्या वस्तू घडवणे सुरू आहे. त्यात अडचणी असंख्य आणि मेहनतही दुप्पट आहे. यात ६० टक्के खडे तर ४० टक्के माती असे प्रमाण आहे. वास्तविक या कुंभारकामातून दहा जणांना रोजगार मिळतो, पण कायद्याचा अडसर त्यांचाही रोजगार हिरावून घेतो की काय अशी परिस्थिती आहे. कधी काळी चार लाख रुपयांच्या आसपास वर्षांची कमाई करणाऱ्या या गावातील कुंभारांच्या घरात आता वर्षांचे दोन ते अडीच लाख रुपयेच पदरात पडतात. कारण, माती तसेच इंधनाचा खर्चही भरपूर आहे. या कामात प्रचंड मेहनत आहे. मोकळ्या आभाळाखाली काम असल्यामुळे बेभरवशाचा पाऊस कधीही पडतो आणि अशा वेळी धुवून गाळून वाळवण्यासाठी ठेवलेली माती वाहून जाते. कुंभार कामादरम्यान माती आणि तत्सम गोष्टींकरिता ज्या ज्या खात्याच्या परवानगी लागतात, त्या सर्व खात्याच्या परवानगी सहज मिळून जातात, पण वनखात्याच्या परवानगी मिळत नाही. त्यामुळे कुंभारांचे जगणे या वनकायद्याने कठीण केले आहे.
- दिवाळीपेक्षाही देवीच्या नवरात्रांमध्ये लाखोंच्या संख्येने घट आणि दिव्यांसाठी मागणी असते. या गावाचे वैशिष्टय़ म्हणजे कुटुंबात एक किंवा दोन व्यक्ती नाही तर कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा मातीकामात हातभार असतो. अलाहाबाद, जबलपूर, मुंबई, पुणे या शहरांमध्येच नव्हे तर विदेशातसुद्धा ‘पेठ’ गावातून तयार होणारी मातीची भांडी आणि कलाकुसरीच्या वस्तूंना मागणी आहे. मातीपासून मातीचे दिवेच नाही तर स्वयंपाकाला लागणाऱ्या चूल आणि शेगडीपासून जेवणाचे ताट, वाटी, पेला, गडवा अशी सर्व भांडी तयार केली जातात.
- शिक्षणापेक्षा विश्वास महत्त्वाचा. शब्दांचा अनुभव महत्त्वाचा. परराज्यातील ज्या मुलींनी ही वाट दाखवली, त्याच आमच्यासाठी गुरू आहेत. त्यांनी केवळ वाटच दाखवली नाही तर मार्गदर्शनही केले. त्यामुळेच इथपर्यंत पोहोचता आले. आज येथून जर्मनीच्या मुली ही कला शिकून गेल्या. इतर देशांमधूनही विद्यार्थी ही कला शिकण्यासाठी येत आहेत. या वेळी मोतीराम खंडारे यांनी जर्मनीची मोनिका ऊर्फ माधुरी आणि इंग्लंडचा मायकल याचा विशेषकरून उल्लेख केला.
- वनकायद्यामुळे जंगलालगतच्या गावकऱ्यांचे जंगलावरील हक्क जवळजवळ संपुष्टात आले असताना आता जंगलाची भूमीदेखील त्यांची राहिलेली नाही.
- जंगलातील वनोपज हा गावकऱ्यांच्या जगण्याचा आधार आणि तो हिरावला असताना जंगलाची भूमीसुद्धा त्यांची राहिलेली नाही. त्यामुळे मातीशी नाळ जुळलेला हा माणूस आता मातीपासूनच दूर व्हायला लागला आहे. कुंभारांची पारंपरिक कला या वनकायद्याने लुप्त होते की काय, अशी भीतीही प्रमोद कुंभारे यांनी व्यक्त केली.