नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित भारतीय मजदूर संघाशी संलग्नित महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे वीज कंपन्यांतील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर २४ ऑगस्टला दुपारी १२ वाजतापासून नागपुरात आंदोलन सुरू आहे. आंदोलनाकडे शासनाने पाठ दाखवली होती. दरम्यान शुक्रवारी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संघटनेची बैठक झाली. त्यानंतर महत्वाचा निर्णय घेतला गेला. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने २४ ऑक्टोंबरला रेशीमबाग मैदानातून मोर्चा काढला होता. हा मोर्चा संविधान चौकावर अडवण्यात आला. त्यानंतर आंदोलकांकडून संविधान चौकात २४ ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू आहे. आंदोलकांची महावितरण, महापारेषण, महानिर्मितीतील एकाही अधिकाऱ्यांनी भेट घेतली नव्हती. त्यामुळे आंदोलनाचे काय होणार? हा प्रश्न उपस्थित झाला होता.
हेही वाचा >>> Dead Lizard Found In Spices : धक्कादायक! पोषण आहाराच्या मसाल्यात चक्क पाल; चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ…
दरम्यान ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (३० ऑगस्ट) नागपुरात आले असता आंदोलकांना चर्चेसाठी बोलावले. संघटनेचे शिष्टमंडळ दुपारी २ वाजता देवगिरी या शासकीय निवासस्थानी फडवीसांसोबत भेटले. या वेळी संघटनेकडून हरियाना येथील कंत्राटी वीज कामगारांशी संबंधित शासन निर्णय व कामगारांचा वस्तूनिष्ठ अहवाल सादर केला . तीन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ व समानता व कंत्राटदार विरहित कामगार पद्धती करिता हरियाना पॅटर्न या दोन प्रमुख मागण्यांवर संघटना ठाम असून ठोस निर्णय तातडीने व्हायला हवा, अशी भूमिका संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात यांनी ऊर्जामंत्र्यांपुढे मांडली.
हेही वाचा >>> देशात दरवर्षी अपघातांमध्ये दीड लाख बळी; गडकरी म्हणतात, “पेट्रोल, डिझेलला हद्दपार…”
ऊर्जामंत्र्यांनी अनेकदा आश्वासन दिल्यावरही त्याची पूर्ताता प्रशासन करत नसल्याचेही याप्रसंगी सांगण्यात आले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंदोलकांना म्हणाले, कामगारांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे तातडीने मी स्वतः प्रशासना सोबत या सर्व विषया संबंधी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढला जाईल. या कष्टकरी कामगारांना नाराज केले जाणार नाही. संघटनेच्या शिष्टमंडळात सी. व्ही. राजेश, गजानन गटलेवार, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात, सचिन मेंगाळे, सागर पवार, उमेश आणेराव, राहूल बोडके, अभिजीत माहुलकर, तात्या सावंत, जयेंद्र थुळ, संतोष कोल्हे, समीर हांडे, योगेश सायवनकर, कामगार संघाचे विठ्ठल भालेराव, दत्ता धामणकर उपस्थित होते. शेवटी उपोषण स्थगित करण्यात आले