नागपूर: महापारेषणच्या बेसा उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर ठप्प पडल्याने दक्षिण नागपुरातील ४५ हजार ग्राहकांचा पुरवठा खंडित होण्याचा धोका आहे. महावितरणने पर्यायी व्यवस्थेतून वीज पुरवठा सुरू केला, परंतु सोमवारी रात्री वीजेची मागणी वाढल्यास वीज खंडित होण्याचा धोका आहे.
ही समस्या येत्या दोन- तीन दिवसात निकाली निघण्याचे संकेत आहे. महावितरणच्या माहितीनुसार शहरातील बहुतांश भागात रात्रीच्या वेळी वीज मागणी दुपट्ट होते. महापारेषणच्या बेसा १३२/ ११ केव्ही उपकेंद्रातून महावितरणच्या १३ वाहिन्या म्हणजे दिघोरी, जानकी नगर, महालक्ष्मीनगर, ताजबाग, मानेवाडा, बेसा, हुडकेश्वर, विहीरगाव आणि त्याला लागून असलेल्या काही भागात वीज पुरवठा होतो. २१ मे रोजी महापारेषणच्या बेसा उपकेंद्रातील २५ एमव्हीए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर ठप्प झाले. त्याचा फटका या भागातील ग्राहकांना झाला. त्यानंतर महावितरणकडून १३ पैकी ४ वाहिन्यांवर सद्यस्थितीत इतर उपकेंद्रातून वीज पुरवठा होत आहे. तर ९ वाहिन्यांना १३२ केव्ही बेसा उपकेंद्रातील दुसऱ्या २५ एम व्ही ए क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मर द्वारे पुरवठा होत आहे.
महापारेषणकडून नादुरुस्त ट्रान्सफॉर्मेर बदलण्यासाठीचे कामही हाती घेतले आहे. त्यांना २५ एमव्हीए क्षमतेचे नवीन ट्रान्सफॉर्मेर उपलब्ध झाले असून ते बदलण्याची कार्यवाही सुरु आहे. परंतु त्यासाठी दोन ते तीन दिवस लागेल. हे काम होईस्तोवर महावितरणने ग्राहकांना पर्यायी व्यवस्थेतून पुरवठा सुरू केला. वीज पुरवठा बाधित असलेल्या भागातील विजेची मागणी दिवसा सुमारे १८ मेगावॅट आहे. मात्र सायंकाळी ७ ते पहाटे ४ या दरम्यान हिच विजेची मागणी दुप्पट होऊन तब्बल ३२ मेगा वॅटपर्यंत पोहचते. त्यामुळे पर्यायी व्यवस्थेतून वीज यंत्रणेवर ताण येऊन यंत्रणनेत बिघाडाचा धोका आहे. त्यामुळे महावितरण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सायंकाळी ७ ते पहाटे ४ दरम्यान येथे चक्राकार पद्धतीने एक ते दोन तासांसाठी भारनियमन केले जाऊ शकते.