नागपूर : राज्यातील काही भागात पावसाने उसंती दिली आहे. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वीच्या तुलनेत आताची स्थिती बघितल्यास विजेच्या मागणीत तब्बल ३ हजार मेगावॉटने वाढ झाली आहे. त्यामुळे बंद करावे लागलेले वीजनिर्मिती संच पुन्हा सुरू झाले आहे. दरम्यान पुन्हा पावसचा अंदाज असल्याने आता विजेच्या मागणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात ३० जुलैच्या दुपारी १.३० वाजताच्या सुमारास विजेची मागणी १९ हजार ८३२ मेगावॉट होती. या काळात सतत पडणाऱ्या पावसाने वातानुकूलित यंत्र, कुलर, पंखे, कृषी पंपासह विद्युत उपकरणांचा वापर कमी झाल्याचा हा परिणाम होता. काही दिवसांपासून विदर्भाच्या काही भागासह राज्यातील इतरही काही भागात पावसाने उसंत दिली आहे. त्यामुळे बुधवारी (१४ ऑगस्ट) राज्यात विजेची मागणी दुपारी २.०८ वाजता २२ हजार ८६२ मेगावॉट नोंदवली गेली. त्यापैकी २० हजार ५८१ मेगावॉट मागणी महावितरणची होती.

हेही वाचा >>> १८५७ ते १९४७! या टप्प्यातील इतिहास, जो कुठेच नाही तो येथे बघा…

मुंबईची मागणी २ हजार २७० मेगावॉट होती. राज्यात कृषी पंपासह वातानुकूलित यंत्र व विद्युत उपकरणांचा वापर वाढल्याने पुन्हा विजेची मागणी वाढली आहे. एकूण मागणीच्या तुलनेत १५ हजार १२३ मेगावॉट विजेची निर्मिती राज्यात होत होती. तर केंद्राच्या वाट्यातून राज्याला ७ हजार ७४० मेगावॉट वीज मिळत होती. राज्यात सर्वाधिक ८ हजार ३६६ मेगावॉट वीजनिर्मिती महानिर्मितीकडून होत होती. त्यात औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील ६ हजार ११० मेगावॉट, उरण गॅस प्रकल्पातील ३६३ मेगावॉट, जलविद्युत प्रकल्पातील १ हजार ८८३ मेगावॉट वीज निर्मितीचा समावेश होता. तर खासगी प्रकल्पांपैकी अदानीकडून २ हजार ८९१ मेगावॅट, जिंदलकडून ८५६ मेगावॅट, आयडियलकडून १ मेगावॅट, रतन इंडियाकडून ६३४ मेगावॅट, एसडब्ल्यूपीजीएलकडून ३४३ मेगावॅट वीजनिर्मिती होत होती. या वृत्ताला महावितरण व महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला.

हेही वाचा >>> ‘लाडकी बहीण’ योजनेच्‍या समितीवर चक्‍क काँग्रेसच्‍या आमदार! या किमयेची चर्चा….

एप्रिल महिन्यात सर्वोच्च मागणीची नोंद महावितरणकडून यंदाच्या उन्हाळ्यात १७ एप्रिल २०२४ रोजी सर्वाधिक २५ हजार ६८ मेगावॉट विजेची मागणी नोंदवली गेली. तर २७ फेब्रुवारीला २५ हजार २३ मेगावॉट, २७ मार्चला २५ हजार ३५ मेगावॉट, १९ एप्रिलला २४ हजार ८०५ मेगावॉट, २२ मे रोजी २४ हजार ६०४ मेगावॉट, ३ जूनला २४ हजार ४४३ मेगावाॅट विजेची मागणी नोंदवली गेली. परंतु आता ही मागणी कमी झाली आहे. तर अधून- मधून एक- दोन दिवस पाऊस लांबल्यास पून्हा मागणीमध्ये वाढही नोंदवली जात असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power demand rise by 3000 mw in maharashtra mnb 82 zws