नागपूर : महानिर्मितीच्या भुसावळ प्रकल्पात ६६० ‘मेगावॅट’ संच क्रमांक ६ चे काम ‘मेसर्स भेल’ करत असून हे संच ऑक्टोबरला कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे राज्याची वीज निर्मिती क्षमता ६६० ‘मेगावॅट’ने वाढणार आहे. या विषयावर महानिर्मिती आणि ‘भेल’च्या अधिकाऱ्यांची बुधवारी दिल्लीत बैठक झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महानिर्मितीच्या भुसावळ ६६० ‘मेगावॅट’ संच क्रमांक ६ चे अभियांत्रिकी, खरेदी आणि उभारणीचे काम केंद्र शासनाचा सार्वजनिक उपक्रम ‘मेसर्स भेल’ कंपनी करीत आहे. या कामांना गतीने पूर्णत्वाकडे नेण्यासाठी महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन यांनी आज दिल्लीत ‘भेल’चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. नलिन शिंघल यांची भेट घेतली. बैठकीत या प्रकल्पातील सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून हा संच ऑक्टोबर २०२३ मध्ये कार्यान्वित करण्यासाठी ‘भेल’कडून प्रयत्न सुरू असल्याचे भेलचे डॉ. शिंघल यांनी सांगितले. ‘भेल’ आणि महानिर्मिती अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत भुसावळ वीज प्रकल्पाच्या विकास कामांवरही सविस्तर चर्चा झाली.

हेही वाचा >>>कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

राज्याच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा प्रकल्प असून त्यामुळे वीज निर्मिती क्षमता ६६० ‘मेगावॅट’ने वाढेल. भुसावळमधील ६६० ‘मेगावॅट’चा ‘सुपर क्रिटिकल’ तंत्रज्ञानावर आधारित हा पहिला तर कोराडीच्या ३ संचानंतर हा महानिर्मितीचा चौथा संच आहे. बैठकीत महानिर्मितीचे संचालक (प्रकल्प), अभय हरणे, मराविमं सूत्रधारी कंपनीचे निवासी कार्यकारी संचालक प्रफुल्ल पाठक तसेच भेलचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power generation capacity of nagpur state will increase by 660 mw mnb 82 amy