अंजुमन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे संशोधन
देशातील नदी, नाले व कालव्यांमधील पाण्याच्या प्रवाहातून मोठय़ा प्रमाणावर वीजनिर्मिती शक्य असून तसे संशोधन नागपूरच्या अंजूमन अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्सच्या विभागातील विद्यार्थ्यांनी नुकतेच केले आहे. या प्रयोगात अधिक सूक्ष्म अभ्यास करून काही बदल केल्यास त्यातून मोठय़ा प्रमाणावर वीजनिर्मिती शक्य आहे, हे विशेष.
देशात अनेक वर्षांपासून विजेची समस्या कायम आहे. काही राज्यांना वीजनिर्मितीसाठी लागणारा कोळसा, गॅस, युरेनियमसह इतर साहित्याची कमतरता असल्याने या समस्येला तोंड द्यावे लागते. काही राज्यात बऱ्याच नदी, नाले, कालवे असून त्यातून बारमाही पाणी वाहते, परंतु तेथे विजेटंचाई असल्याचेही धक्कादायक वास्तव आहे. या पाणी असलेल्या भागातील वीजसमस्या सोडवण्यासाठी नागपूरच्या अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या एका चमूने एका प्रकल्पावर संशोधन केले. त्याअंतर्गत त्यांनी वाहणाऱ्या नद्या, नाले, कालव्यांमधील पाण्याच्या प्रवाहातून वीजनिर्मिती करून एक नवीन आशा पल्लवित केली आहे. या प्रयोगांतर्गत या पाणी प्रवाहात काही अंतरांवर दीड ते दोन फुटांचा खड्डा करून त्यात एक विशिष्ट टर्बाईन बसवण्याची गरज आहे. या टर्बाईनला विशिष्ट पद्धतीच्या ब्लेडस् लावल्या जातात. त्या ब्लेडवर वेगाने पाणी वाहल्यास ते गेअर मेकॅनिझमच्या तंत्राने पाण्याच्या गतीहून दुप्पट गतीने टर्बाईन फिरवून वीज निर्माण करते. प्राथमिक स्तरावर हा प्रयोग विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातच एक कृत्रिम टाके तयार करून केला. यावर अधिक संशोधन करून त्यात सुधारणा केल्यास हा प्रयोग अधिक पाणी असलेल्या भागात विजनिर्मितीकरिता वरदान ठरू शकतो. त्यामुळे देशाच्या अनेक भागातील विजेची समस्या काही प्रमाणात तरी सुटू शकेल. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रयोगात ०.००५९ मिटर क्युब प्रतिसेकंद पाण्याचा प्रवाह दिला गेला आहे. त्यातून प्रतितास ४.९५८ मेगाव्ॉटची निर्मिती करण्यात आली. या प्रयोगासाठी पंपाच्या सहाय्याने पाणी टाक्यात सोडून त्याच्या प्रवाहाला वेग देण्यात आला होता. या प्रयोगासाठी कोणी पुढे सरसावणार काय?, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या संशोधनासाठी प्राचार्य साजीत अन्वर, इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख डॉ. अर्चना शिरभाते व प्रा. अकिल अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली अश्विनी कारेमोरे, रश्मी दाते, स्मिता माहुलकर, आकीब खान, मुजम्मील अहसन, शफात खान या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा