नागपूर : डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात रविवारी रात्री ८.१५ ते १०.४० वाजताच्या दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाला. सर्व वार्डातील रुग्ण अंधारात राहिल्याने रुग्णांचा जीव टांगणीला होता. नातेवाईकांनी या काळात उपचार थांबल्याचा आरोप केला. डागा प्रशासनाने मात्र रुग्णांची आवश्यक काळजी घेतल्याचे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य नागपुरातील स्त्रीरोग व प्रसूतीसाठी महत्त्वाचे शासकीय रुग्णालय म्हणून डागा रुग्णालयाची ख्याती आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक प्रसूती या रुग्णालयात होतात. रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून येथे जनरेटर असणे अपेक्षित आहे. परंतु रात्री सुमारे ८.१५ वाजता येथील वीजपुरवठा तांत्रिक कारणाने बंद पडला. वीज नसल्याने सर्व वार्ड अंधारात होते. त्यामुळे उपचार थांबल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. सुरक्षिततेसाठी काही रुग्णांना इतरत्र हलवले गेले. डागा प्रशासनाने रुग्ण हलवण्याची गरज पडली नसून उपचार थांबले नसल्याचा दावा केला. काही नातेवाईक भ्रमणध्वनीवरील टॉर्चच्या माध्यमातून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना धीर देत होते. तर वार्डातील बरेच रुग्ण उकाड्यामुळे रुग्णालय परिसरात गोळा झाले होते.

हेही वाचा >>> जागतिक पर्यावरण दिन: ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या अंमलबजावणीतील त्रुटी उघड!

या विषयावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पारवेकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. तर दुसऱ्या एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर वीज खंडित झाल्याचे सांगत, शल्यक्रिया गृह व लेबर रूममध्ये जनरेटरची वीज असल्याचा दावा केला. संबंधित विभागाचे तांत्रिक कर्मचारी दुरुस्ती करत असून लवकर वार्डात वीज सुरळीत होणार असल्याचा दावा केला. सर्वाधिक प्रसूती डागांमध्ये होत असतानाही येथील सर्व वार्डात जनरेटरच्या वीजेची सोय नसल्याने वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे.

‘वॉर्मर’ही बंद पडले!

कमी वजनाच्या मुलांसाठी आवश्यक ‘वॉर्मर’ची वीज खंडित झाल्याने त्यांना आवश्यक उष्णता देण्यासाठी ब्लँकेटचा वापर करण्यात आला.

अनेक भागात वीजपुरवठा खंडित

पश्चिम नागपुरातील जयताळा, एकात्मता नगर, पन्नासे लेआऊट, भेंडे लेआऊट येथे तीन ते पाच तास वीजपुरवठा खंडित राहिल्याचा नागरिकांचा आरोप आहे. तर महावितरणने लगेच दुरुस्ती करून पुरवठा सुरळीत केल्याचा दावा केला. शहरातील बऱ्याच भागात विजेचा लपंडाव बघायला मिळाल्याचा नागरिकांचा आरोप आहे.