सौभाग्य योजनेतून सर्वाना सरसकट वीज जोडणी; जनता दरबारात पालकमंत्र्यांचे ‘एसएनडीएल’ला आदेश

घराचे नकाशे मंजूर असणाऱ्यांनाच नवीन वीज जोडणी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले असताना सोमवारी राज्याचे ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरसकट सर्वाना सौभाग्य योजनेतून वीज जोडणी देण्याचे आदेश  सोमवारी दिल्याने अधिकारी गोंधळात पडले.

लकडगंज झोनमध्ये बावनकुळे यांचा जनता दरबार झाला. त्यात एसएनडीएलच्या विरोधात १७ तक्रारी आल्या. समतानगर, दुर्गानगर, शारदा नगर, पारडीसह काही भागातील नागरिकांना अर्ज करूनही वीज जोडणी मिळाली नाही, अशी तक्रार होती. काहींनी आमचे नवीन घर तयार झाल्यावरही विजेअभावी ते आजही भाडय़ाच्या घरात राहत असल्याचे सांगितले. त्यावर एसएनडीएलचे सचिन पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाता दाखला देत घराचे मंजूर नकाशे बघूनच नवीन जोडणी देण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. याप्रकरणात एसएनडीएलकडून न्यायालयात एक याचिका दाखल करून नियम शिथिल करण्याची विनंती केल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, याप्रसंगी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी तेथे उपस्थित नसल्याचे बघत त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली गेली. मंत्री म्हणून आम्ही जनता दरबारात नागरिकांच्या शिव्या ऐकत असून तुम्ही सूट बूटवर कार्यालयात बसून काय करता? हा प्रश्न त्यांना सर्व उपस्थितांच्या समोर विचारला गेला. एसएनडीएलने तातडीने या सर्वाना वीज जोडणी न दिल्यास त्यांचे जुने प्रकरण बाहेर काढून त्यांच्यावर कडक कारवाईची तंबी याप्रसंगी दिली गेली. या विषयावर महावितरण व एसएनडीएलच्या अधिकाऱ्यांना त्वरित एकत्र बसून प्रश्न सोडवण्याचे आदेश दिले. दोन्ही खात्याच्या अधिकारींच्या बैठकीत वकिलांच्या मदतीने हा प्रश्न न्यायालयात कसा सोडवता येईल, त्यावर कारवाईबाबत चर्चा झाली, परंतु जनता दरबारात पालकमंत्र्यांनी या सर्व ग्राहकांना तातडीने जोडणी देण्याचे आदेश दिल्याने व उच्च न्यायालयानुसार त्यांना ग्राहकाच्या घराच्या मंजुरीचे नकाशाशिवाय जोडणी देता येत नसल्यामुळे नेमके कुणाचे आदेश पाळावे, हा प्रश्न अधिकाऱ्यांपुढे उपस्थित झाला आहे.

कच्च्या घरांना जोडण्या दिल्या

पारडीसह काही भागात एसएनडीएलकडून नवीन वीज खांब उभे करून दीड वर्षे झाल्यावरही अद्याप वीज तार टाकले गेले नाही. अनेकांना  अवास्तव देयके दिली जात आहेत. काही ग्राहकांना बासबल्लीवरच वीज जोडणी दिली गेली. त्यावर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन एसएनडीएलने दिले. दरम्यान, एसएनडीएलचे व्यवसाय प्रमुख सोनल खुराणा उपस्थित नसल्याबद्दल त्याच्यावर नाराजी व्यक्त केली गेली.

पाच हजार कुटुंबाला सोलर वॉटर हिटर

शहरातील पाच हजार नागरिकांना वॉटर हिटर देण्याची घोषणा पालकमंत्र्यांनी याप्रसंगी केली. त्यासाठी ४० टक्के निधी महापालिका, ४० टक्के महाऊर्जा आणि २० टक्के निधी संबंधित कुटुंबाला द्यावा लागणार आहे. शहरातील प्रत्येक झोनमध्ये ५०० कुटुंबाला वॉटर हिटर दिला जाणार आहे. या संदर्भात कारवाई करण्याचे निर्देश मनपा विद्युत विभागाला दिले गेले. याप्रसंगी महापालिकेच्या विद्युत विभागाने ३१ मे पर्यंत शहरातील सर्व पथदिवे एलईडीवर येणार असल्याचे सांगितले.

Story img Loader