लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर: ६७ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा पार पडलेल्या बल्लारपूर तालुक्यातील विसापूर क्रीडा संकुलाचे २ लाख ९१ हजाराचे बिल थकल्याने वीज मंडळाने सोमवारी दुपारी या क्रीडा संकुलाचा वीज पुरवठा खंडित केला. विशेष म्हणजे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले होते. आता वीज पुरवठा खंडित झाल्याने खेळाडूंची गैरसोय झाली आहे.

विसापुरचे या क्रीडा संकुलात २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ६७ वी राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस , क्रीडा मंत्री संजय बनसोडे, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले होते. या कार्यक्रमाला नामवंत खेळाडूंनी हजेरी लावली होती. सोहळ्याची भव्यदिव्यतेच मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केलं होतं. या स्पर्धेचे उद्घाटन समारंभात मोठा झगमगाट केला गेला. विद्युत रोशनाईने तर अनेकांचे डोळे दीपले. ज्या क्रीडा संकुलात ही स्पर्धा झाली त्या संकुलात आता अंधार दाटला आहे.

आणखी वाचा-गडचिरोली : नक्षलग्रस्त गर्देवाडात २४ तासांत उभारले पोलीस मदत केंद्र

विदयुत देयकाची भरणा न केल्याने महावितरणाने ही कार्यवाही सोमवारी दुपारी केली. ज्या स्पर्धेच्या जाहिरातीसाठी लाखो रुपये उधळल्या गेलेत ती स्पर्धा जिथे पार पडली त्याच विदयुत देयक भरायला क्रीडा प्रशासनाकडं निधी नाही, ही मोठी शोकांतिका आहे. तीन दिवस इथे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडलेत. स्पर्धा आटोपली आणि जिथे ही स्पर्धा झाली त्या संकुलाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झालं. स्पर्धेच्या निमित्ताने भव्य दिव्य अशी रोषणाई करण्यात आली. त्यामुळे विद्युत देयक लाखाचावर गेलं.२ लाख ९१ हजार १०० रुपयाचे देयक थकित आहे. देयक भरल्या गेलं नाही. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला अशी माहिती महावितरण तर्फे देण्यात आली. दरम्यान खंडित केलेला वीज पुरवठा रात्री ९ वाजता पूर्ववत सुरू करण्यात आला अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power supply to ballarpur taluka sports complex interrupted rsj 74 mrj
Show comments