भंडारा : महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही मात्र असे असतानाही युती आणि आघाडीतील घटक पक्षांकडून मुख्यमंत्रीपदावर दावा केला जात आहे. यामुळे मुख्यमंत्री नक्की कोण होणार? या चर्चांना आता उधाण आले आहे. त्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा करीत ‘मीच मुख्यमंत्री होणार’ अशी जणू भविष्यवाणीच केली आहे. पटोलेंच्या या वक्तव्यामुळे आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भूवया उंचावल्या आहेत तर काँग्रेसमधील इच्छुकही संभ्रमावस्थेत आहेत.
सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे चित्र आहे. वेगवेगळ्या मुद्द्यावरून दोघेही एकमेकांना धारेवर धरत आहेत. त्यातच आमदार नाना पटोले यांच्या नावाची ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून जोरदार चर्चा रंगू लागली. मात्र यावर खासदार पटेल यांनी भावी हे भावीच राहणार असे वक्तव्य करीत नानांनी दिवास्वप्न पाहू नये असा सूचक इशारा दिला. खासदार पटेल यांच्या या वक्तव्यावर आमदार नाना पटोले यांनी जोरदार पलटवार केला आहे. ‘मी मुख्यमंत्री होणारच’ असे पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांना ठणकावून सांगितले आहे. आमदार पटोले यांनी पटेलांना सडेतोड उत्तर देण्याच्या नादात आघाडीत मात्र भूकंपाचे हादरे बसल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा – ”तुम्ही आमदार नाही, सावकार निवडून दिला….”, रवी राणांवर तुषार भारतीय यांची टीका
काय म्हणाले होते खासदार पटेल ?
भंडारा जिल्ह्यात बुधवारी प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांचे नाव न घेता “भावी हे भावीच राहतील”, असे वक्तव्य केले होते. खासदार पटले यांचा नेम बरोबर लागला. त्यामुळेच नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनीही प्रफुल्ल पटेलांना प्रतिउत्तर दिले.
नानांनी दिले सडेतोड उत्तर…
नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांना उत्तर दिले आहे. “मला आमदार होऊ देत नव्हते. पण आमदार झालो, खासदार होऊ देत नव्हते खासदार झालो, विधानसभा अध्यक्षसुद्धा झालो आणि आता मुख्यमंत्री होणारच” असे वक्तव्य नाना पटोले यांनी भंडारा येथे केले आहे. माझ्या नशिबात जे असेल ते होईल. हायकमांडचा आदेश असेल तर होईल, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे.
हेही वाचा – चंद्रपूर : उडाणपुलाच्या श्रेयावरून राजकीय लढाई
आघाडीत चलबिचल….
नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मात्र भूवया उंचावल्या आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी तर पटोले यांच्या वक्तव्यापासून स्वतःला दूर ठेवले आहे. आपल्याला काही माहीत नाही असे ते म्हणाले. काँग्रेसमध्ये नाना पटोले यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार हे नेते मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. तर आघाडीत उद्धव ठाकरे यांचीही इच्छा लपून राहिलेली नाही. राष्ट्रवादीतही जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांची नावे घेतली जात आहेत. एकीकडे निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण हे ठरवू असे बोलले जात आहे. अशा वेळी नेते मात्र मुख्यमंत्री होणारच अशी विधाने करत आहेत. त्यामुळे आघाडीत तणावाचे वातावरण निर्माण होत आहे.