गोंदिया : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाले म्हणजे कुणी भावी मुख्यमंत्री ठरत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुकीत आघाडीला विजय मिळवता आला पाहिजे, तीन पक्षात तुमच्या नावावर संमती असली पाहिजे नवनिर्वाचित आमदारांचे तुमच्या नावावर एकमत झाल्या शिवाय कोणीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही, माझ्या माहितीप्रमाणे सध्या कोणाचेही नाव या पदाच्या स्पर्धेत नाही म्हणून आजघडीला येथील स्वयंघोषित मुख्यमंत्री गोंदिया भंडारा येथील जनतेला मत मिळविण्याकरिता भूलथापा देण्याच्या प्रयत्न करीत असतील तर ते योग्य नाही, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांना लगावला.
खासदार प्रफुल पटेल गोंदिया येथे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात आले असताना माध्यमांशी बोलत होते. पटेल म्हणाले, राहुल गांधी गोंदिया येथे येऊन आपल्या भाषणात त्यांनी या संदर्भातील काहीही सुतोवाच केले नाही. तरी पण हे आज स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणून गोंदिया भंडारा जिल्ह्यातील भोळी भाबडी जनतेला भुलथापा देत आहेत. आज मी पण म्हणू शकतो की या सरकारमध्ये मी हे बनणार ते बनणार पण हे काही माझ्या हातात नाही ,असे मोठे निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असते आणि माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेस पक्षामध्ये असो वा महाविकास आघाडीमध्ये यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या हा प्रचारात मुद्दा उपस्थित करणे हा त्यांचा एक राजकीय स्टंट आहे आणि लोकांनी त्यांच्या अशा प्रकारे स्टंट याआधीही बघितलेला आहे त्यामुळे गोंदिया भंडाऱ्याची जनता याला बळी पडणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे.
हेही वाचा…शेतात दारूचा साठा सापडला, आरोप प्रत्यारोप सूरू.
गोंदिया भंडारा जिल्ह्यातील सात ही जागा महायुती जिंकणार आहे २३ नोव्हेंबर ला निकालातून हे कळणार तेव्हा यांच्या हा भावी मुख्यमंत्री पदाच्या फुगविलेला फुगा आपोआप फुटणार आहे.
मी पण काँग्रेस पक्षात बराच काळ काढलेला आहे. त्यामुळे मला काँग्रेस पक्षात कशा प्रकारे मुख्यमंत्री निवडतात हे ठाऊक आहे. त्यामुळे कुणीही उठावे आणि मीच मुख्यमंत्री म्हणावे हा या महाराष्ट्रातील जनते सोबत धोका असल्याचेही खासदार प्रफुल पटेल या प्रसंगी म्हणाले.