गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण आणि मागासलेल्या आदिवासी बाहुल्य आणि नक्षलग्रस्त गोंदिया आणि बल्लारशहा दरम्यान दुहेरी रेल्वे मार्ग टाकण्यात येत आहे.या बाबत रेल्वे मंत्र्यांचे स्वागतच पण या मार्गावरील महत्त्वाच्या अशा सौंदड, नवेगाव बांध, अर्जुनी मोरगाव, ब्रह्मपुरी या स्थानकावर जलदगती (एक्सप्रेस) गाड्यांचे थांबे द्या, अशी मागणी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना आज शुक्रवार ११ एप्रिल रोजी केली. ते दृकश्राव्य प्रणालीद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील, गोंदिया चे आमदार विनोद अग्रवाल, तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले, गडचिरोली चे सह पालकमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित होते.
गोंदिया-बल्लारशहा रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी ४,८१९ कोटी रुपयांच्या प्रकल्पाची घोषणा केली. या प्रसंगी बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की गोंदिया-बल्हारशाह रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण मुळे गडचिरोली ला पण रेल्वेने जोडण्याचा मार्ग सुकर होणार आहे त्यामुळे गडचिरोली येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या परिसराला स्टील हब करण्याच्या प्रयत्नाला मोठा हातभार या रेल्वे लाईन च्या गडचिरोली ला जोडण्याने होणार आहे.पण या सोबतच गोंदिया बल्लारशहा रेल्वे मार्गावरील महत्त्वपूर्ण अशा ग्रामीण क्षेत्रातील सौंदड, नवेगाव बांध, अर्जुनी मोरगाव, ब्रह्मपुरी या रेल्वे स्थानकावर या मार्गावर धावणाऱ्या एक ही जलदगती गाड्यांचे थांबे नाहीत त्यामुळे ही गावे मुख्य प्रवाहात येण्यापासून आज ही वंचित आहेत.
सौंदड, नवेगाव बांध, अर्जुनी मोरगाव, ब्रह्मपुरी या रेल्वे स्थानकावर जलदगती गाड्यांचे थांबे दिल्यास या मागास असलेल्या क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार असल्यामुळे केंद्रिय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात लवकरात लवकरच निर्णय घेण्याची मागणी खासदार प्रफुल पटेल यांनी केली. गोंदिया- बल्हारशाह रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणामुळे या मार्गावरील इतर ही महत्वाचे स्थानक यांचा पण कायापालट होणार आहे. गोंदिया- बल्हारशाह या लहान रेल्वे मार्गाचे मोठ्या मार्गात परिवर्तन पण मी गोंदिया भंडारा लोकसभेचा खासदार असतानाच झाले होते. त्यामुळे आता या मार्गाचे दुहेरीकरण होत असल्याचा आनंद आहेच पण हे सगळं व्हायला २५ वर्ष लागली त्यामुळे आता किमान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात होत असलेले हे दुहेरीकरण लवकर व्हावे हीच अपेक्षा असल्याचे ही या वेळी खासदार प्रफुल पटेल म्हणाले.