गोंदिया : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर ईडीने शनिवारी सकाळी दुसऱ्यांदा छापा टाकला. यासंदर्भात माजी केंद्रीयमंत्री, खासदार प्रफुल पटेल यांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. या कारवाईबद्दल मला सध्या पूर्ण माहिती नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यात अशा कारवायांना ऊत आले आहे. मात्र, आमचे सहकारी हसन मुश्रीफ अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे व्यक्ती आहेत आणि त्यांच्या विरोधात कुठलाही पुरावा ईडीला मिळणार नाही, असा विश्वास खा. प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशातील विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी केंद्रीय तपास संस्थांच्या कारवाईबाबत सरकारला पत्र लिहिले आहे. सध्याचे सरकार ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देण्याच्या हेतुने करीत आहे. हे देशांतर्गत विविध राज्यात घडत असलेल्या कारवाईवरून दिसून येतेच. ईडी, सीबीआय या स्वतंत्र अधिकार असलेल्या तपास संस्था आहेत. ते त्यांच्या पद्धतीने कारवाई करतात, असे सरकार म्हणते. मात्र, या कारवायांमधून मोजक्याच लोकांना लक्ष्य का केले जात आहे, असा प्रश्नही पटेल यांनी उपस्थित केला. दरम्यान, नागालँडमधील एनडीपीपी आणि भाजपा युतीला राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिलेल्या समर्थनाबाबत बोलण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Praful patel reaction after ed raid on hasan mushrif house sar 75 ysh