अमरावती : प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार राजकुमार पटेल हे येत्‍या १० ऑक्‍टोबर रोजी शिवसेनेच्‍या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. पटेल यांनी रविवारी धारणी येथे आयोजित कार्यकर्त्‍यांच्‍या संवाद बैठकीत ही घोषणा केली. प्रहार जनशक्‍ती पक्षाचे संस्‍थापक आमदार बच्‍चू कडू यांच्‍यासाठी हा मोठा धक्‍का मानला जात आहे.

रा‍जकुमार पटेल यांनी धारणी येथील बालाजी मंगलम सभागृहात रविवारी कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पटेल म्‍हणाले, सर्व कार्यकर्त्‍यांची तयारी असेल, तर येत्‍या १० सप्‍टेंबरला प्रवेशासाठी सज्‍ज व्‍हा. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍यासोबत आपली चर्चा झाली आहे. त्‍यांच्‍या नेतृत्‍वात आपल्‍याला विकासाचा मार्ग गाठायचा आहे.

हेही वाचा >>>ताडोबातील “छोटी तारा” च्या मातृत्वाचा क्षण…

आमदार बच्‍चू कडू यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना भाजप, शिवसेनेवर टीका केली आहे. बच्‍चू कडू म्‍हणाले, भाजप-सेनेची ही खेळी आहे. राजकुमार पटेल यांच्‍यासह अजूनही दोन-तीन महत्‍वाचे कार्यकर्ते पक्ष सोडून जाण्‍याच्‍या विचारात असल्‍याचे मला कळले आहे. ते टाळता येत नाही, पण आम्‍हाला लढण्‍याची सवय झालेली आहे. आधी एकटाच होतो, आता एकटे राहू आणि पुन्‍हा एकाचे दहा करण्‍याची ताकद बच्‍चू कडू यांच्‍यामध्‍ये आहे.

राजकुमार पटेल यांनी रविवारी आयोजित केलेल्‍या बैठकीच्‍या निमंत्रण पत्रिकेवर प्रहार पक्षाचे नाव, चिन्‍ह तसेच बच्‍चू कडू यांचे छायाचित्र नव्‍हते. केवळ मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍यासह राजकुमार पटेल आणि त्‍यांचे पूत्र रोहित पटेल यांची छायाचित्रे होती. राजकुमार पटेल हे प्रहारमधून बाहेर पडणार, याची चर्चा गेल्‍या अनेक दिवसांपासून सुरू होती.

हेही वाचा >>>Aheri Assembly Constituency : अहेरी विधानसभा मतदारसंघ : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) धर्मरावबाबा आत्रामांना शह देण्यात यशस्वी ठरणार?

बच्‍चू कडू म्‍हणाले, भाजप आणि शिवसेना जी खेळी खेळत आहेत, त्‍याचा फटका त्‍यांना  विदर्भात बसेल. प्रत्‍येकाचा राजकीय स्‍वार्थ असतो, त्‍यामुळे राजकुमार पटेल हे पक्ष सोडून जात असतील, तर त्‍याची आम्‍हाला पर्वा नाही. त्‍यांनी सुखात रहावे. आम्‍ही विचारांसोबत कधीही तडजोड केली नाही. आम्‍ही सुद्धा त्‍यांच्‍याशी मैत्री कायम ठेवून राजकुमार पटेल यांच्‍या विरोधात उमेदवार देऊ.

एकनाथ शिंदे यांनी आम्‍हाला दिव्‍यांग मंत्रालय दिले, त्‍याचे ऋण कायम आहे, पण, आम्हाला जो शिंदे गटाने तोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला आम्ही व्यवस्थित उत्तर देऊ, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशारा बच्‍चू कडू यांनी दिला आहे.