अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे अमरावती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अबरार यांनी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांना पाठिंबा दिल्याने प्रहार जनशक्ती पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या घडामोडींमुळे मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. डॉ. अबरार यांनी शुक्रवारी डॉ. सुनील देशमुख यांच्या निवासस्थानी पोहचून त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले. याबद्दल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. शहरात पसरलेला संभ्रम दूर करण्यासाठी आणि धर्मनिरपेक्ष पक्षाला विधानसभेत मजबूत करण्यासाठी समविचारी लोकांसोबत संवाद साधल्यानंतर आपण कॉंग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. अबरार यांनी म्हटले आहे.
डॉ. अबरार यांनी डॉ. सुनील देशमुख यांना पाठिंब्याचे पत्र दिले, यावेळी माजी महापौर विलास इंगाले, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत आदी उपस्थित होते. कॉंग्रेस पक्षासाठी डॉ. अबरार अहमद यांचा पाठिंबा बळ देणारा ठरला आहे. डॉ. अबरार यांनी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी प्रचारही सुरू केला होता, पण अचानकपणे त्यांनी कॉंग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. डॉ अबरार यांनी शुक्रवारी निवडणूक रिंगणातील एका उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला. मात्र हा निर्णय त्यांचा वैयक्तिक असून पक्षाचा त्याच्याशी कुठलाही संबंध नसल्याचे प्रहार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा…केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात,’ मोदींनी नक्षलवाद व आतंकवाद संपविला’
प्रहारचे उमेदवार डॅा.अबरार यांनी आज एका उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याचे पत्र दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. त्यानंतर पक्षाचे जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू आणि प्रवक्ते जितु दुधाने यांनी पक्षाची भूमिका मांडली. अल्पसंख्यांक समाजाला न्याय मिळावा, यासाठी प्रहार पक्षाने अमरावतीची जागा त्या समाजातील व्यक्तीला देण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार डॉ. अबरार यांना पक्षाने उमेदवारी दिली. त्यांनी व कार्यकर्त्यांनी जोमाने काम सुद्धा सुरू केले, मात्र यादरम्यान डॉ. अबरार यांनी कुणाशीही चर्चा न करता परस्पर एका उमेदवाराच्या घरी जावून त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले. त्यानंतर आम्हाला याबाबत माहिती मिळाली.
हेही वाचा…‘लाडक्या बहिणींना रक्कम नियमित मिळणार का? कारण मध्य प्रदेशात…’
पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेत येणाऱ्या दोन दिवसांत कार्यकारिणीची बैठक होणार असून अमरावती मतदारसंघात कुणाला पाठिंबा द्यावा, याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला शहराध्यक्ष बंटी रामटेके, जोगेंद्र मोहोड, शेख अकबर, वलगावचे सरपंच सुधीर उगले, प्रशांत शिरभाते, प्रदीप जयस्वाल यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.