अमरावती : अमरावती जिल्ह्यात निवडणूक प्रचार शिगेला पोहचला आहे. पदयात्रा, सभांच्या माध्यमातून उमेदवार मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच आरोप आणि प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा या भाजपच्या उमेदवारांसाठी जिल्ह्यात जोरदार प्रचार करीत आहेत. पण, महायुतीतील दोन घटक पक्ष राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या अमरावतीतील उमेदवार सुलभा खोडके आणि दर्यापूरचे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांच्या विरोधात त्यांनी उघड विरोधी भूमिका घेतली आहे. त्यातच अचलपूरचे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यातील वैर सर्वश्रृत आहे. अशातच बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा राणा दाम्पत्याला डिवचले आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान राणा दाम्पत्य अत्यंत खालच्या पातळीवर टीका करीत आहेत. लोकांची बदनामी करीत आहेत. राणा दाम्पत्य भाजपसोबत असले, तरी अंतर्गत बैठका मात्र काँग्रेससाठी घेत आहेत. त्यांना भाजप संपवायची आहे. या जिल्ह्यात भाजप ज्यांनी उभी केली, पायाभरणी केली, ते भाजपमध्ये कुठे आहेत? नवनीत राणा या २०१९ मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताकदीवर निवडून आल्या. त्या आता भाजपच्या प्रमुख बनल्या. देशातील एवढा मोठा पक्ष रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या दावणीला बांधून ठेवून भाजपला कमी करण्याचा त्यांचा डाव आहे. अर्थात पुढे ‘स्वाभिमान’ चालेल आणि भाजप संपेल, अशी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी केली आहे.
हेही वाचा…मुनगंटीवार रावत यांच्या परस्परांना, विजयाच्या शुभेच्छा, जोरगेवार पडवेकर यांचा सोबत चहा
अचलपुरात बच्चू कडू यांच्या विरोधात भाजपतर्फे प्रवीण तायडे हे रिंगणात आहेत, तर काँग्रेसचे बबलू देशमुख हे परंपरागत विरोधक यावेळीही लढत देत आहेत. या मतदारसंघात तिरंगी लढतीची चिन्हे असताना बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर टीका करून भाजपच्या निष्ठावंत नेत्यांनादेखील इशारा दिला आहे. राणा दाम्पत्य हे भाजपवर वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नातून भाजपलाच संपवायला निघाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राणा दाम्पत्य भाजपच्या मंचावर वावरत असले, तरी त्यांच्या कॉंग्रेससोबत अंतर्गत बैठका सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामुळे पुन्हा एकदा राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.
हेही वाचा…डॉ. सचिन पावडे ठरताहेत ‘ एक्स ‘ फॅक्टर, आघाडी व युतीस धास्ती.
राणा दाम्पत्य अमरावतीत सुलभा खोडके यांच्या विरोधात, तर दर्यापुरात शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे अभिजीत अडसूळ यांच्या विरोधात युवा स्वाभिमान पक्षाचे रमेश बुंदिले यांचा प्रचार करीत आहेत. त्यामुळे महायुतीतील फूट उघड झाली आहे.