अमरावती : नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांचे सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षण संचालकांनी (योजना) नुकतीच सूचना जारी केली आहे. परंतु शिक्षकांकडे अनेक प्रकारची कामे असताना शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाबरोबर आता निरक्षरांचे सर्वेक्षण करायचे कसे, असा प्रश्न प्रहार शिक्षक संघटनेने शिक्षणमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात उपस्थित केला आहे.
केंद्र शासनाने निरक्षरांना साक्षर करण्यासाठी नवभारत साक्षरता कार्यक्रम (उल्लास) उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठी निरक्षरांचे सर्वेक्षण केले जाते आणि त्यानंतर त्यांना साक्षर केले जाते. याबाबत महाराष्ट्राच्या शिक्षण संचालनालयाने (योजना) शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाबरोबरच आता निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश काढले आहेत. शिक्षकांना निरक्षर व्यक्तींची नोंदणी ‘उल्लास’ मोबाइल अॅपवर करायची आहे. शिवाय, अध्यापनही करायचे आहे. राज्यातील सर्व शाळांनी दाखलपात्र विद्यार्थी सर्वेक्षण आणि शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण याबरोबरच निरक्षरांचे सर्वेक्षण करावे, असे सूचनेत म्हटले आहे.
शैक्षणिक गुणवत्तेचे काय?
भर उन्हात परीक्षा सुरू आहे. शैक्षणिक गुणवत्ता का खालावते आहे? याचा साकल्याने विचार करून त्याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे, मात्र याकडे सरकारचे दुर्लक्ष असून शिक्षण विरोधी धोरण या स्थितीला कारणीभूत आहे. याविरुद्ध आवाज बुलंद करू, असे प्रहार शिक्षक संघटनेचे अध्यक्ष महेश ठाकरे यांनी सांगितले.
कोणतेही वेगळे काम दिलेले नाही : शिक्षण संचालक
शिक्षकांना कोणतेही वेगळे काम करावे लागणार नाही. दरवर्षी शाळेत कोणते विद्यार्थी दाखल करून घ्यावेत, याबाबतचे दाखलपात्र विद्यार्थी सर्वेक्षण आणि शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण हे नियमित होतच असते. त्यासोबतच असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यासाठी सूचना जारी केल्या आहेत, अशी माहिती शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली.
पाचवी, आठवीच्या अनुत्तीर्णांची परीक्षा घ्यायची कधी ?
पाचवी आणि आठवीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचे शासन निर्देश असल्याने या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायच्या कधी, असा नवा पेच शिक्षकांपुढे आहे. शिक्षण विभागाने यंदा राज्यभरात एकसमान परीक्षा वेळापत्रक जारी केल्याने ८ ते २५ एप्रिल या कालावधीत पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा घेतल्या जात आहेत. २५ एप्रिलला परीक्षा संपल्यावर अवघ्या पाच दिवसांत १ कोटी १७ लाख विद्यार्थ्यांचा निकालही द्यायचा आहे. अनेक योजना अंमलबजावणीसाठी शिक्षकांवर लादल्या जात आहेत. नेमके शिक्षकांनी करायचे काय? विकास कोणाचा साधायचा? असा प्रश्न प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी शिक्षण मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केला आहे.